तुमची एक चूक दिवाळीचा आनंद हिरावू शकते! सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वाघमारे यांचे काळजी घेण्याचे आवाहन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर फटाके फोडताना काळजी घेण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार व गोंदिया दि.04: प्रकाश आणि आनंदाचा सण असलेली दिवाळी संपूर्ण जिल्ह्यात उत्साहात साजरी होत आहे. मात्र, या आनंदाच्या उत्सवात फटाक्यांमुळे लहान मुले, नागरिक किंवा कोणत्याही जीवाला इजा पोहचू नये, यासाठी आरोग्य प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी फटाके फोडताना घ्यावयाची काळजी व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी खालील मार्गदर्शक सूचना व नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे:
फटाके फोडताना घ्यावयाची काळजी (आरोग्य प्रशासनाचा सल्ला)
सुती कपड्यांचा वापर करा: फटाके फोडताना लहान मुलांना किंवा स्वतः नायलॉन, टेरिलिन अथवा सिंथेटिक स्वरूपाचे सैल कपडे घालू देऊ नका. शरीराला घट्ट बसणारे सुती (कॉटन) कपडेच वापरावेत.
सुरक्षित व मोकळी जागा निवडा: घराच्या आत, बाल्कनीत किंवा अरुंद गल्ल्यांमध्ये फटाके फोडू नका. फटाके नेहमी मैदानासारख्या खुल्या आणि सुरक्षित जागेतच फोडावेत.
हँड सॅनिटायझरचा वापर टाळा: सॅनिटायझरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण असल्याने ते अत्यंत ज्वलनशील असते. फटाके फोडण्यापूर्वी हाताला सॅनिटायझर लावू नका, हात साध्या साबणाने स्वच्छ धुवावेत.
अंध/सुप्त फटाक्यांपासून सावध राहा: एखादा फटाका पेटवल्यानंतर तो वाजला नाही, तर तो तपासण्यासाठी लगेच जवळ जाऊ नका किंवा वाकून पाहू नका. त्यावर लांबून पाणी टाकून तो निकामी करा.
लहान मुलांवर पालकांचे लक्ष: लहान मुलांना कधीही एकट्याने फटाके फोडू देऊ नका. फटाके पेटवताना नेहमी मोठ्या व्यक्तींचे नियंत्रण असणे अनिवार्य आहे. नेहमी लांब अगरबत्ती किंवा काठीचा वापर करून सुरक्षित अंतरावरून फटाका पेटवावा.
फटाक्यांच्या धुरापासून बचाव आणि प्रतिबंधात्मक आवाहन
श्वसनाचा त्रास असलेल्यांनी दूर राहावे: फटाक्यांमधून निघणारा विषारी धूर फुफ्फुसांसाठी अत्यंत घातक असतो.त्यामुळे दमा, अॅलर्जी, खोकला किंवा इतर श्वसनाचे विकार असलेल्या रुग्णांनी, ज्येष्ठ नागरिकांनी आणि लहान मुलांनी फटाके फोडण्याच्या ठिकाणाहून दूर राहावे.
मास्कचा वापर करा: फटाके फोडताना किंवा परिसरात वावरताना चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल नक्की बांधा, जेणेकरून विषारी वायू थेट शरीरात जाणार नाही.
हरित फटाक्यांना प्राधान्य: पारंपरिक आणि जास्त धूर निघणारे फटाके पूर्णपणे टाळावेत. त्याऐवजी कमी धूर आणि कमी आवाज निर्माण करणाऱ्या ‘हरित फटाक्यांचा’ वापर करावा.
प्राणी आणि पर्यावरणाची काळजी: हा धूर पर्यावरणाला हानी पोहोचवतोच, पण पाळीव प्राण्यांनाही याचा प्रचंड त्रास होतो.त्यामुळे धूरमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करावा.
प्रतिबंधात्मक उपाययोजना व सज्जता
पाणी आणि वाळूची बादली जवळ ठेवा: फटाके फोडण्याच्या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी आणि लागलेली आग त्वरित विझवण्यासाठी पाणी आणि वाळूने भरलेली बादली नेहमी सज्ज ठेवावी.
आपत्कालीन औषधोपचार किट सज्ज: घरी प्रथमोपचार किट तयार ठेवा. दुर्दैवाने त्वचा भाजल्यास त्यावर तातडीने फक्त थंड पाणी ओतावे. भाजलेल्या जागेवर शाई, तेल, तूप किंवा कोणतेही घरगुती मलम डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लावू नये.
ध्वनी आणि वायू प्रदूषणावर नियंत्रण: फटाक्यांच्या तीव्र आवाजामुळे आणि धुरामुळे लहान मुले, गरोदर महिला, वृद्ध आणि श्वसनाचे आजार (अस्थमा) असलेल्या रुग्णांना तीव्र त्रास होतो. त्यामुळे शक्यतो कमी आवाजाचे व कमी धूर निघणारे हरित फटाके वापरण्यावर भर द्यावा. पाळीव प्राण्यांचीही विशेष काळजी घ्यावी.
“दिवाळीचा आनंद हा प्रत्येकासाठी सुरक्षित असायला हवा. फटाक्यांमुळे होणाऱ्या लहानशा दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना घडू शकते.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आरोग्य नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे आणि सुरक्षित दिवाळी साजरी करावी,” असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार आणि सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी गोंदिया जिल्ह्यातील जनतेला केले आहे. कोणत्याही आपत्कालीन वैद्यकीय मदतीसाठी तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राशी किंवा शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दिपावलीच्या सर्व गोंदियावासियांना आरोग्य विभागाकडुन हार्दिक शुभेच्छा….सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद कुमार वाघमारे यांचे गोंदिया जिल्हावासीयांना आवाहन



