गोरेगाव येथील जगत कला व वाणिज्य महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन गोंदिया, दि. 4 : मेरा युवा भारत, गोंदिया तसेच युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने विकसित भारत युवा संवाद कार्यक्रमाचे आयोजन जगत कला व वाणिज्य महाविद्यालय, गोरेगाव येथे करण्यात आले. ‘आपल्या मतदानाच्या अधिकारांची माहिती जाणून घ्या’ (Know Your Vote) या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमातून युवकांमध्ये मतदानाच्या अधिकारांविषयी जागरूकता निर्माण करण्यासोबतच लोकशाही प्रक्रियेतील त्यांचा सक्रिय सहभाग वाढविण्यावर भर देण्यात आला.
कार्यक्रमात युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे नामनिर्देशित युवा आयकॉन अमन भंडारकर यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा महत्त्वपूर्ण लोकशाही अधिकार असून, त्याचा योग्य वापर करून युवकांनी लोकशाही बळकट करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती देऊन मतदार यादीच्या पुनरीक्षणाचे महत्त्व, उद्देश आणि आवश्यकता स्पष्ट केली. या प्रक्रियेबाबत समाजमाध्यमांवर किंवा अन्य माध्यमांतून प्रसारित होणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत स्रोतांकडूनच माहिती घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी मेरा युवा भारतचे उपसंचालक सौरभ कुमार निषाद यांनी कार्यक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे आणि रूपरेषा उपस्थितांना समजावून सांगितली. युवकांनी लोकशाही व्यवस्थेतील आपली भूमिका ओळखून मतदान प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे त्यांनी नमूद केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य नीलकंठ लांझे यांनी उपस्थितांना लोकशाहीची शपथ दिली. लोकशाही मूल्यांचे जतन करण्यासाठी प्रत्येकाने मतदानाबाबत जागरूक राहणे आवश्यक असल्याचे सांगून त्यांनी युवकांना जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा समन्वयक बबन मेश्राम उपस्थितांना संबोधित करून युवकांनी सामाजिक व लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेण्यासोबतच जागरूक नागरिक बनावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी क्षयरोग समुपदेशक प्रज्ञा कांबळे यांनी क्षयरोगाची माहिती सांगून राष्ट्रीय सेवा योजनांच्या स्वयंसेवकांकडून ग्राम हिरडामाली येथे जनजागृती करण्याचे कार्य सुरु आहे हे प्रशंसनीय आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ललिता धवाले यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कैलास जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले.




