गोंदिया: बालकांमधील न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत संपूर्ण देशात राबविण्यात येणाऱ्या सांस SAANS अभियानाची अंमलबजावणी गोंदिया जिल्ह्यात करण्यात सुरुवात झाली आहे. जागतिक न्यूमोनिया दिनाचे औचित्य साधून दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ ते फेब्रुवारी २०२७ अखेरपर्यंत अभियान राबविण्यात येणार असल्याची माहीती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे.
बालकांमधील न्यूमोनियाचे प्रमाण कमी करणे, न्यूमोनियाची लक्षणे वेळेत ओळखणे, योग्य उपचार उपलब्ध करून देणे आणि बालमृत्यू रोखणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. राष्ट्रीय आरोग्य धोरण २०१७ नुसार न्यूमोनियामुळे होणारे बालमृत्यू प्रति हजार जिवंत जन्मांमागे तीनपेक्षा कमी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असुन सदर अभियान जिल्ह्यातील बालकांसाठी संजीवनी ठरणार असल्याची माहीती डॉ.गोल्हार यांनी यावेळी दिली आहे.
या अभियानांतर्गत Protection (संरक्षण), Prevention (प्रतिबंध) आणि Treatment (उपचार) या “पीपीटी” त्रिसूत्रीवर विशेष भर देण्यात आला असुन जन्मानंतर एका तासाच्या आत स्तनपान सुरू करणे, पहिले सहा महिने केवळ स्तनपान, सहा महिन्यांनंतर पूरक आहार, वेळापत्रकानुसार लसीकरण, जीवनसत्त्व ‘अ’ची मात्रा, हातांची स्वच्छता आणि घरातील हवा प्रदूषणमुक्त ठेवणे याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याची माहीती सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंद कुमार वाघमारे यांनी दिली आहे.
न्यूमोनियापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी पीसीव्ही लसीकरणाबाबत विशेष जनजागृती करण्यात येणार आहे.सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमांतर्गत सहाव्या आठवड्यात, चौदाव्या आठवड्यात आणि नवव्या महिन्यात पीसीव्ही लसीचे डोस देण्यात येतात.जास्तीत जास्त पात्र बालकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत विशेष प्रयत्न केले जाणार असल्याची माहीती जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.राजेश बेळमकर यांनी दिली आहे.
गृहभेटी, माता बैठका, ग्राम आरोग्य स्वच्छता व पोषण दिवस, सोशल मीडिया, पोस्टर्स, व्हिडिओ संदेश, ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती तसेच पथनाट्यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत न्यूमोनिया प्रतिबंध व उपचारासंबंधी माहिती पोहोचविण्यात येणार आहे.
बालकांमध्ये जलद श्वासोच्छ्वास, छाती आत ओढली जाणे, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे आढळल्यास पालकांनी तातडीने जवळच्या आरोग्य संस्थेशी संपर्क साधावा. बालकांच्या आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळेत उपचार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
‘न्यूमोनिया नाही तर बालपण सही’ या घोषवाक्याद्वारे पालक, कुटुंबीय आणि समाजातील सर्व घटकांनी बालकांना न्यूमोनियापासून सुरक्षित ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभाग, जिल्हा परिषद गोंदिया यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.




