२४x७ सेवा, मुख्यालयी राहणे अनिवार्य; शून्य प्रसूती असलेल्या संस्थांवर कारवाईचे निर्देश – कामात सुधारणा न झाल्यास कठोर कार्यवाही अटळ! गोंदिया : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांची दि.18 नोव्हेंबर रोजी आरोग्य संवाद यात्रेदरम्यान गोंदिया जिल्ह्यातील विविध आरोग्य संस्थांना भेटी दिल्या असता आरोग्य सेवा आणि संस्थांच्या दैनंदिन कामकाजात काही त्रुटी निदर्शनास आल्या होत्या. या त्रुटींची गांभीर्याने दखल घेत त्यावर तातडीने सुधारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री यांनी वरिष्ठ अधिकारी यांना दिले होते. त्यानुसार आरोग्यमंत्र्यांच्या आदेशान्वये गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा विशेष आढावा घेण्यासाठी आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक दि.21 नोव्हेंबर रोजी केटिएस जिल्हा सामान्य रुग्णालयात संपन्न झाली.
या आढावा बैठकीसाठी आरोग्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी डॉ.स्वप्नील सांगळे, संचालक डॉ.विजय कंदेवाड तसेच नागपुर विभागीय उपसंचालक डॉ.शंभरकर यांनी गोंदिया येथे उपस्थित राहून जिल्ह्यातील आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. गोंदिया येथील केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांचे कामकाज तपासण्यात आले.आरोग्य संवाद यात्रेदरम्यान आढळलेल्या त्रुटी, आरोग्य संस्थांमधील सेवा-सुविधांची सद्यस्थिती, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती, रुग्णसेवेचा दर्जा आणि विविध आरोग्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेण्यात आला.यावेळेस जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी,ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिक्षक,प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आपआपल्या आरोग्य संस्थेतील कार्यरत डॉक्टर्स,आरोग्य कर्मचारी,पर्यवेक्षक यांचेसह व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते.
राज्यस्तरीय व विभागीय वरिष्ठ अधिकारी यांनी विशेष आढावा सभेदरम्यान जिल्ह्यातील कार्यरत डॉक्टर्स,आरोग्य कर्मचारी,पर्यवेक्षक यांना २४x७ आरोग्य सेवा प्रभावीपणे सुरू ठेवणे, शून्य प्रसूती असलेल्या आरोग्य संस्थांवर विशेष लक्ष देण्यात येणे, १३ सर्व्हिसेस पॅकेज व १४ प्रकारच्या तपासण्या करणे, जॉब चार्टनुसार कामकाज आणि गृहभेटींचे दैनंदिन रिपोर्टिंग बंधनकारक,जिल्हास्तरावर स्वतंत्र ॲक्शन प्लॅन नुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमित पर्यवेक्षण व भेटी, कामात सुधारणा न झाल्यास कठोर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचे ठोस तंबी यावेळी देण्यात आले
२४x७ आरोग्य सेवा प्रभावीपणे सुरू ठेवण्याचे निर्देश
जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये नागरिकांना चोवीस तास आरोग्य सेवा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यासाठी २४x७ सेवा प्रभावीपणे कार्यान्वित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले. वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहूनच रुग्णांना सेवा देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मुख्यालयी वास्तव्यास नसलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. तसेच उपस्थितीच्या नोंदीसाठी फेस बायोमेट्रिक प्रणाली अनिवार्य करून त्याच आधारे वेतन अदा करण्याबाबत स्पष्ट सूचना देण्यात आल्या.
शून्य प्रसूती असलेल्या आरोग्य संस्थांवर विशेष लक्ष
जिल्ह्यातील काही आरोग्य संस्थांमध्ये प्रसूतीची संख्या शून्य असल्याची बाब आढावा बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आली.याबाबत संबंधित संस्थांच्या कामकाजाची जबाबदारी निश्चित करून प्रसूती सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. शून्य प्रसूती असलेल्या संस्थांच्या कामकाजात सुधारणा न झाल्यास संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रत्येक पात्र आरोग्य संस्थेत सुरक्षित प्रसूती सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
१३ सर्व्हिसेस पॅकेज व १४ प्रकारच्या तपासण्या उपलब्ध करणे आवश्यक
आरोग्य संस्थांमध्ये नागरिकांना शासनाच्या निर्धारित निकषांनुसार १३ सर्व्हिसेस पॅकेज आणि १४ प्रकारच्या तपासण्या उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साधनसामग्री व सेवा-सुविधांचा योग्य वापर करून रुग्णांना संस्थास्तरावरच आवश्यक आरोग्य सेवा मिळतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले.
तसेच बाह्यरुग्ण विभाग, आंतररुग्ण विभाग आणि डे केअर सेवा नियमितपणे व प्रभावीपणे कार्यान्वित ठेवण्यास सांगण्यात आले. आरोग्य संस्थांमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आवश्यक सेवा वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने मिळाली पाहिजे, यावर विशेष भर देण्यात आला.
कामात सुधारणा न झाल्यास कठोर प्रशासकीय कार्यवाही
आढावा बैठकीत आरोग्य सेवांमधील त्रुटी दूर करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या. केवळ कागदोपत्री अहवा सादर न करता प्रत्यक्ष आरोग्य संस्थांमधील सेवा-सुविधांमध्ये सुधारणा दिसून आली पाहिजे. नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देणे ही प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची प्राथमिक जबाबदारी आहे. आगामी काळात कामकाजात अपेक्षित सुधारणा न आढळल्यास संबंधितांवर कठोर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा या बैठकीतून देण्यात आला.
बैठकीला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी व आरोग्य यंत्रणेचे प्रतिनिधी उपस्थित
या आढावा बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.पुरुषोत्तम पटले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी लडॉ. अरविंदकुमार वाघमारे, ACS डॉ. तृप्ती कटरे, सहसंचालक कुष्ठरोग डॉ.महेंद्र धनविजय, वैद्यकीय अधीक्षक डॉ.निकिता पोयाम, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे, साथरोग अधिकारी डॉ.निरंजन अग्रवाल यांच्यासह राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आरोग्य संवाद यात्रेतून समोर आलेल्या त्रुटींवर प्रत्यक्ष सुधारात्मक कार्यवाही करण्याच्या दृष्टीने हा आढावा महत्त्वपूर्ण ठरला.जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य संस्थेने आपल्या कामकाजात सुधारणा करून नागरिकांना वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि अखंडित आरोग्य सेवा उपलब्ध करून द्यावी, हा या बैठकीचा मुख्य उद्देश होता. आरोग्य सेवेत हलगर्जीपणा, कामातील दिरंगाई अथवा जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती खपवून घेतली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आढावा बैठकीतून दिला.




