दहावी-बारावीच्या परीक्षांचे नियोजन काटेकोरपणे करा -शिक्षणमंत्री दादाजी भुसे

दुष्काळग्रस्त ३१० तालुक्यांतील १५ लाख २८ हजार विद्यार्थ्यांना सुमारे ९६.२७ कोटींची परीक्षा शुल्कमाफी   

मुंबई, दि.२६  : फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचे नियोजन सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने व काटेकोरपणे करावे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना निर्धारित वेळेत पूर्ण कराव्यात, असे निर्देश शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी आज मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत दिले.

या बैठकीस शालेय विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी, मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना सुमारे ९६.२७ कोटींची शुल्कमाफी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १८ मार्च, तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२७ या कालावधीत घेण्याचे निश्चित केले आहे. दोन्ही परीक्षांचे निकाल एप्रिल २०२७ अखेर जाहीर करण्याचे नियोजन आहे. बारावीच्या प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जानेवारी ते ६ फेब्रुवारी, तर दहावीच्या परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत होणार आहेत.

राज्य शासनाच्या निर्णयानुसार दुष्काळग्रस्त घोषित ३१० तालुक्यांतील दहावी आणि बारावीच्या आतापर्यंत अर्ज केलेल्या १५ लाख २८ हजार ६२७ विद्यार्थ्यांना अंदाजे ९६ कोटी २७ लाख रुपयांची परीक्षा शुल्कमाफी देण्यात येणार आहे. यामध्ये दहावीच्या ८ लाख ५२ हजार ४९६ आणि बारावीच्या ६ लाख ७६ हजार १३१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यापूर्वी परीक्षा शुल्क भरलेल्या पात्र विद्यार्थ्यांना परतावा देण्याची प्रक्रियाही सुरू आहे. ३० नोव्हेंबर ही नियमित शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

परीक्षांसाठी बारावीची ३ हजार ३३२ आणि दहावीची ४ हजार ९९७ केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षिततेसाठी बारावीसाठी ५०६ आणि दहावीसाठी ५२५ परिरक्षक केंद्रांचे नियोजन करण्यात आले असून या ठिकाणी चोवीस तास पोलीस संरक्षण आणि सीसीटीव्ही व्यवस्था राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कॉपीमुक्त अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर

परीक्षा पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय दक्षता समित्यांमार्फत देखरेख ठेवण्यात येणार आहे. जानेवारी २०२७ मध्ये शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये जनजागृती सप्ताह राबविण्यात येईल. संवेदनशील केंद्रांवर भरारी पथके, बैठी पथके आणि आवश्यकतेनुसार ड्रोनद्वारे निगराणी ठेवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रांच्या ५०० मीटर परिसरातील झेरॉक्स केंद्रे परीक्षा कालावधीत बंद ठेवण्यात येतील, असे राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.

प्रश्नपत्रिकांचे सुरक्षित डिजिटल वितरण, उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग आणि डिजिटल मूल्यमापन प्रक्रियेलाही प्राधान्य देण्यात येत आहे. राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखड्यातील निवडक विषयांच्या उत्तरपत्रिकांचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मूल्यमापन करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.

विद्यार्थ्यांना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देता यावी, यासाठी मंडळाचे १० आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे ३०० समुपदेशक उपलब्ध राहणार आहेत. तसेच ‘टेली मानस’ हेल्पलाइन क्रमांक १४४१६ आणि ‘मनोदर्पण’ हेल्पलाइन क्रमांक ८४४८४४०६३२ द्वारे विद्यार्थ्यांना समुपदेशन व मार्गदर्शन मिळणार आहे.

दहावी आणि बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांनी परीक्षा आवेदनपत्रे ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सादर करावीत. परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षेच्या अनुषंगाने सर्व प्रशासकीय व तांत्रिक तयारी वेळेत पूर्ण करून नियोजनाची काटेकोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: दहावी-बारावीच्या परीक्षांचे नियोजन काटेकोरपणे करा -शिक्षणमंत्री दादाजी भुसे, ID: 31381

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर