राज्यातील आरोग्य विज्ञानाच्या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता लागू आहे. त्यांच्या या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.
राज्यातील वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत शासकीय, शासन अनुदानित व खासगी विनाअनुदानित महाविद्यालयातील (अभिमत विद्यापीठे/स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे वगळून) आरोग्य विज्ञान व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांना शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे (Centralized Admission Process-CAP) प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी EBC, SEBC, EWS या प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र विद्यार्थ्यांना (भोजन, निवास व निर्वाह) खर्च भागविण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता देण्यात येतो. या भत्त्यात शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून वाढ करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.
मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या शहरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 32,000, निवास भत्ता 20,000, निर्वाह भत्ता 8,000 असा एकूण 60,000 तर इतर महसुली विभागीय शहरातील व उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 28,000, निवास भत्ता 15,000, निर्वाह भत्ता 8,000 असा एकूण 51,000 इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 25,000, निवास भत्ता 12,000, निर्वाह भत्ता 6,000 असा एकूण 43,000 तर तालुका ठिकाणी उच्च घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी भोजन भत्ता 23,000, निवास भत्ता 10,000, निर्वाह भत्ता 5,000 असा एकूण 38,000 रूपये असा करण्यात आला आहे.



