माविम मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना महिला संरक्षण कायदे, वारसा हक्क व विधी सेवांबाबत मार्गदर्शन गोंदिया, दि. 28 : महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्क व अधिकारांची माहिती व्हावी, तसेच अन्याय व अत्याचाराविरोधात कायदेशीर लढा देण्यासाठी त्या सक्षम व्हाव्यात, या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), गोंदिया यांच्या वतीने नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील माविम मित्र मंडळाच्या (MMM) पदाधिकाऱ्यांसाठी कायदेविषयक साक्षरता प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. माविम कार्यालय, गोंदिया येथे हे प्रशिक्षण पार पडले.
या प्रशिक्षणात महिलांचे कायदेशीर हक्क व अधिकार, घरगुती हिंसाचार प्रतिबंधक कायदा, वारसा हक्क, मालमत्तेतील महिलांचे अधिकार, सार्वजनिक लाभ व शासकीय योजनांसंदर्भातील कायदेशीर तरतुदी, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंधक कायदा (POSH Act) आणि महिलांची सामाजिक सुरक्षितता या महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
महिला व बाल विकास विभागाच्या संरक्षण अधिकारी रेखा बघेले आणि लोक अभिरक्षक कार्यालय, गोंदिया येथील उपलोक अभिरक्षक अॅड. मंगला बन्सोड यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये उपलब्ध असलेले कायदेशीर संरक्षण, तक्रार निवारण यंत्रणा, महिलांचे कायदेशीर अधिकार तसेच आवश्यकतेनुसार उपलब्ध होणाऱ्या विधी सेवांची माहिती यावेळी देण्यात आली.
यासोबतच राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या (NALSA) DAWN (Drug Awareness and Wellness Navigation – For a Drug Free India) Scheme, 2025 अंतर्गत अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम, त्याविरोधातील जनजागृती आणि अमली पदार्थमुक्त समाजनिर्मिती याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाला माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदीप काठोळे, सहायक जिल्हा समन्वय अधिकारी सतीश मार्कंड, महिला व बाल विकास विभागाच्या सनदी लेखापाल पायल बागडे, मनीषा किरमे, भागवत सूर्यवंशी यांच्यासह माविमचे जिल्हा व तालुकास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.
महिलांना केवळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे पुरेसे नसून त्यांना आपल्या कायदेशीर हक्क व अधिकारांची जाणीव असणेही तितकेच आवश्यक आहे. कायद्याची योग्य माहिती असल्यास महिला अन्यायाविरोधात निर्भयपणे आवाज उठवू शकतात. तसेच स्वतःला न्याय मिळवून देण्यासोबतच इतर महिलांनाही न्याय मिळवून देण्यासाठी त्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. ग्रामीण भागातील महिलांपर्यंत कायदेविषयक माहिती पोहोचविण्यासाठी माविम मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रभावी माध्यम म्हणून कार्य करावे, हा या प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन योगिता राऊत यांनी केले. या प्रशिक्षणामुळे माविम मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढण्यासह ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या हक्क, अधिकार आणि उपलब्ध कायदेशीर संरक्षणाबाबत मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे.




