घरगुती पाणी वापरासाठीचे बोअरवेल व जुने बोअर फ्लश करण्यास सूट; आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई गोंदिया, दि. 28 : जिल्ह्यात अपुरे पर्जन्यमान आणि जलाशयांमधील कमी पाणीसाठ्यामुळे संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती लक्षात घेता, भूजल स्रोतांचे संरक्षण करण्यासाठी संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात नवीन बोअरवेल खोदकामे तसेच विद्यमान बोअरवेल अधिक खोल करण्याच्या कामांवर पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष मंदार पत्की यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 अंतर्गत हा आदेश जारी केला आहे.
जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, गोरेगाव, आमगाव, सालेकसा, देवरी, अर्जुनी मोरगाव आणि सडक अर्जुनी या सर्व आठही तालुक्यांमध्ये ही बंदी लागू राहणार आहे. खासगी व्यक्ती, शेतमालक, गृहनिर्माण संस्था, बांधकाम व्यावसायिक, उद्योग, व्यावसायिक आस्थापना तसेच बोअरवेल खोदकाम करणारे कंत्राटदार व रिगमालक यांना हे निर्बंध लागू असतील.
मात्र, शासकीय यंत्रणांमार्फत पाणीटंचाई निवारणासाठी आणि सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी करण्यात येणाऱ्या बोअरवेल खोदकामांना या बंदीतून सूट देण्यात आली आहे. तसेच घरगुती पाणी वापरासाठी बोअरवेल खोदकाम आणि जुन्या बोअरवेलचे फ्लशिंग करण्यासाठी स्वतंत्र परवानगीची आवश्यकता राहणार नाही.
बंदी लागू असलेली सुरू असलेली खोदकामे तात्काळ थांबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस विभाग आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी समन्वयाने आदेशाची अंमलबजावणी करावी. प्रतिबंधित खोदकाम सुरू असल्याचे आढळल्यास संबंधित काम थांबवून जबाबदार व्यक्तींविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियमातील तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
सर्व तहसीलदार व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आदेशाच्या प्रसिद्धीचा आणि अंमलबजावणीचा प्रारंभिक अहवाल तीन दिवसांत सादर करावा, तसेच त्यानंतर साप्ताहिक अहवाल देण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिले आहेत. हा आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहणार असून, विद्यमान बोअरवेलचा वापर बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेले नाहीत.




