साखरीटोला-: (रमेश चुटे) देशातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे, शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविणे व राष्ट्रविकासासाठी गेल्या ९ वर्षांमध्ये केंद्र सरकारने सर्वोच्च प्राधान्य दिले आहे असे मत गोंदिया जिल्हा भाजपचे अध्यक्ष केशव मानकर यांनी सालेकसा येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने 4 जून रोजी गोंदिया जिल्हा भाजपच्या वतीने सालेकसा येथील पूर्ती पब्लिक शाळेच्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हा अध्यक्ष केशव मानकर, माजी आमदार भेरसिंहभाऊ नागपुरे, महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सचिव व माजी आमदार संजय पुराम, आदिवासी नेते शंकर मडावी, भाजपचे तालुका अध्यक्ष गुणवंत बिसेन, प.स. सदस्य गुमानसिंग उपराडे उपस्थित होते. ते म्हणाले आज राष्ट्रसेवेला ९ वर्षे पूर्ण करत असताना, नम्रतेने आणि कृतज्ञतेने भाजप ओतप्रोत आहे. घेतलेला प्रत्येक निर्णय, प्रत्येक कृती, लोकांचे जीवन सुधारण्याच्या इच्छेने केले आहे. विकसित भारताच्या उभारणीसाठी आणखी कठोर परिश्रम करत राहू, असे म्हटले आहे. गेल्या ९ वर्षांत, भारतातील गरीब लोकांचे जीवनमान उंचावण्याचा आणि त्यांचा सन्मान राखण्यासाठी किसान सन्मान योजना, पीएम आवास योजना, उज्वला योजना, हरघर नल योजना, आयुष्यमान आरोग्य योजना, गरीब कल्याण योजना, जनधन योजना, मुद्रा योजना, फसलं बिमा सारख्या मूलभूत गरजेच्या योजना व उपक्रम राबवले आहे. लाखो लोकांचे जीवनमान उंचावणे व त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे ध्येय असून मोदी सरकारचे 9 वर्ष सुशासन आणि गरिबांच्या कल्याणाचे युग आहे असे म्हटले आहे. याकालावधीत राष्ट्रीय सुरक्षा, आत्मनिर्भरता, जगात भारताचे स्थान, आर्थिक सक्षमीकरण व विविध क्षेत्रात ऐतिहासिक निर्णय घेऊन सरकारने अनेक युगप्रवर्तक निर्णयांद्वारे भारताच्या भविष्याला नवी दिशा दिली आहे. आज ‘स्वातंत्र्याच्या अमृतकाळात’ विकसित भारताचा संकल्प घेऊन देश पूर्ण आत्मविश्वासाने आणि उत्साहाने प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करत आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीतून जगातील अनेक विकसित देश आजही बाहेर पडू शकलेले नाहीत मात्र भारत विकासाच्या मार्गावर वेगाने पुढे जात आहे असे नमूद केले. उपस्थित पत्रकारांचे आभार माजी आमदार संजय पुराम यांनी मानले.
