वीज पुरवठा विभागाने दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्याचे निर्देश केले निर्गमित गोंदिया :(कन्हैया क्षीरसागर) जंगलव्याप्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांना दिवसा १२ तास वीजपुरवठा उपलब्ध होण्यासाठी शरद पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांचे नेतृत्वात शेकडो शेतकऱ्यांनी आमरण उपोषण पुकारले होते. यांच्या आंदोलनाला यश आले असून वीज पुरवठा विभागाने गोंदिया जिल्ह्यातील कृषी वीज पंपांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्याचे निर्देश निर्गमित केले आहेत.
सविस्तर असे की, गोंदिया जिल्हा हा जंगलव्याप्त जिल्हा आहे. जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवर अवलंबून असून येथील शेतकरी खरीप व उन्हाळी हंगामात शेतात विविध पिकांची लागवड करतात. लागवडीखालील विविध क्षेत्र पिकांना सिंचनाची सोय उपलब्ध होण्यासाठी शेतकऱ्यांकडे कृषी वीज पंप सुविधा उपलब्ध आहे.
मागील काही वर्षापासून कृषी वीज पंपांना रात्रीचे प्रहरी विजपुरवठा होत असल्याने सिंचनासाठी शेतशिवारात गेलेल्या शेतकऱ्यांवर वन्य प्राण्यांनी हल्ला केल्याच्या घटना उघडकीस आल्या होत्या. ही बाब शरद पवार गटाचे गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांच्या लक्षात येताच त्यांनी शासनाला निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या कृषी वीज पंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्याची मागणी केली होती.
एवढेच नव्हे तर कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांनी ही बाब शरद पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. पाटील यांनी ही बाब हिवाळी अधिवेशन मांडली होती. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते मात्र आश्वासनाची पूर्तता न झाल्याने संतप्त झालेल्या शेकडो शेतकऱ्यांनी शरद पवार गटाचे गोंदिया जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मिथुन मेश्राम यांच्या नेतृत्वात आमरण उपोषणाला सुरुवात केली होती.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीच वीज वितरण कंपनीच्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांनी उपोषण स्थळी भेट देत ही बाब प्रशासकीय स्तरावरील असल्याचे सांगत उपोषण मागे घेण्याची विनंती केली होती. मात्र आंदोलन कर्त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचे अधिकाऱ्यांना ठणकावले होते.
दरम्यान, १ फेब्रुवारी रोजी वीजपुरवठा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी उपोषण मंडपाला पुन्हा भेट देत १० दिवसांत दिवसा वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांना १० दिवसांचा कालावधी दिला व १० दिवसांत दिवसा १२ तास वीज पुरवठा न झाल्यास राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला होता. २ फेब्रुवारी रोजी वीजपुरवठा विभागाने कृषी वीज पंपांना दिवसा १२ तास वीजपुरवठा करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. बॉक्स :
श्रेय लाटण्यासाठी सरसावले आजी-माजी लोकप्रतिनिधी
गोंदिया जिल्ह्यातील शेतक-यांच्या कृषी वीज पंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्यासाठी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पुढाकार घेत आंदोलन पुकारले होते. या आंदोलनाची दखल घेत विजपुरवठा विभागाने कृषी वीज पंपांना दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्याचे आदेश निर्गमित करतात जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी श्रेय लाटण्याचे काम सुरू केले आहे. काही लोकप्रतिनिधींनी तर चक्क १ दिवसाआधी दिलेले निवेदन सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. प्रतिक्रीया :
जिल्ह्यातील विविध समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस लढत राहणार -मिथुन मेश्राम गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज पुरवठा करण्यासाठी आमरण उपोषण पुकारले होते. दिवसा १२ तास विजापुरवठा झाले नसते तर राष्ट्रीय महामार्गावर भव्य चक्काजाम आंदोलनाची ही तयारी ठरविली होती. मात्र जिल्ह्यातील काही आजी-माजी लोकप्रतिनिधी श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. वास्तविक पाहता या मागणीसाठी कोणी प्रयत्न केले हे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना चांगल्याने माहीत आहे. श्रेय लाटणाऱ्यांना जनता येणाऱ्या काळात धडा शिकवेलच मात्र राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी अग्रेसर राहणार असल्याचे मत मिथुन मेश्राम यांनी व्यक्त केले.
