गोंदिया-: (रमेश चुटे)
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची गोंदियातली नियोजित 7 एप्रिल शनिवार म्हणजे उद्याची सभा रद्द करण्यात आली आहे. आता ही सभा पुढच्या आठवड्यात गुढीपाडव्यानंतरच होण्याची शक्यता आहे. महायुतीचे लोकसभेचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची 7 एप्रिल शनिवार रोजी गोंदियात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली होती. पण ऐनवेळी ही सभा रद्द करण्यात आली आहे. नेमकं कोणत्या कारणास्तव ही सभा रद्द झाली? यामागील कारणही समोर आलं असून लोकसभा निवडणुकीसाठी सातत्याने बैठका आणि दौरे सुरु असल्यामुळे कदाचित अमित शाह यांना थकवा जाणवत असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह प्रकृतीच्या कारणास्तव गोंदियाच्या सभेला उपस्थित राहू शकणार नाहीत. त्यामुळे त्यांची उद्या 7 एप्रिलची गोंदिया येथील सभा रद्द करण्यात आली आहे. पुढील सभेचं नियोजन हे 12 किंवा 13 एप्रिलला राहणार असल्याची माहिती प्रदेश प्रवक्ते विश्वास पाठक यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
