देवरीः- दि.२४ : गेल्या आठवड्यापासून सुरू असलेले महसूल कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी कामबंद आंदोलन आज महसूल मंत्री आणि राज्य महसूल कर्मचारी संघटना यांच्यात आज दोन टप्प्यात पार झालेली चर्चा आणि वाटाघाटीनंतर मागे घेण्यात आल्याचे संघटनेकडून जाहीर करण्यात आली.आज बुधवार, २४ जुलै पासून राज्यातील सर्व महसूल कर्मचारी कामावर रुजू झाले.महाराष्ट्रातील महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यासाठी मागील १५ जुलै पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले होते. या बैठकीला राज्य समन्वयक राजू धांडे राज्य अध्यक्ष, किशोर हटकर सचिव, लक्ष्मण नसमवार कार्याध्यक्ष, राज ढोमणे राज्य उपाध्यक्ष,राज्य सरचिटणीस व गोंदिया जिल्हा अध्यक्ष आशिष प्र.रामटेके आदी उपस्थित होते.सरकारने महसूल कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आज मंगळवारी २३ जुलैला मुंबई येथील मंत्रालयातील महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात चर्चेकरीता बोलावले होते.दोन टप्प्यात ही बैठक पार पडली. महसूल संघटनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.मात्र नियोजित वेळी प्रारंभीची बैठक अप्पर मुख्य सचिव यांनी घेतली. त्यावेळी मागण्याशी संबधित मंत्रालयीन विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.त्यानंतर सायकांळी ७ वाजेच्या सुमारास महसुल मंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकारीसोबत चर्चा केली.मंत्री महोदयांनी देखील सर्व मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तसेच संपामध्ये सामील असलेल्या कर्मचाऱ्यांचा कोणत्याही प्रकारे पगार कापला जाणार नाही याची ग्वाही मंत्र्यांनी दिली.
या बैठकीत आकृतीबंधाच्या मुख्य मागणीबाबत मोठा निर्णय झाला.अपर मुख्य सचिव यांनी,‘दांगट समितीचा अहवाल आहे तसा स्वीकारण्यात येत असल्याचे’ सांगितले.लवकरात लवकर त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल, संबंधित कार्यासनाने कार्यवाही चालू केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे अव्वल कारकून या पदाचे पदनाम सहाय्यक महसुल अधिकारी करण्याबाबत शासनाने सामान्य प्रशासन विभागाकडे निर्णयासाठी‘नस्ती’ सादर केली आहे. तसेच इतर मागण्यांबाबत देखील संबंधित विभाग प्रमुख यांना सूचना दिलेल्या असून त्याबाबतचे सर्व ‘फाईल’ कार्यवाहीत असल्याचे संबंधित अधिकारी यांनी सांगितले. त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल असे अपर मुख्य सचिव यांनी संघटनेसोबतच्या बैठकीत सांगितले.अव्वल कारकून संवर्गाच्या वेतन त्रुटी संदर्भातील ‘नस्ती’ वित्त विभागाकडे सादर करण्यात आली आहे. त्यामध्ये लवकरच सकारात्मक निर्णय होणार असून विभागीय दुय्यम सेवा व महसूल अर्थ परीक्षा बाबत दोन्ही परीक्षा मिळून एकच परीक्षा घेण्याबाबत नस्ती तयार करणयात आली आहे. लवकरच निर्णय घेण्यात येईल असावं सांगितले. मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाल्याने संप मागे घेण्याचे आवाहन सचिव यांनी केले.
