♦साखरीटोला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर उद्घाटन थाटात
सालेकसा-: व्यक्तीने वर्तमानात जगत असताना भूतकाळाला विसरता कामा नये ! कारण भूतकाळ हे वर्तमानाला परीपक्व व बळ देण्याचे काम करत असते. वर्तमान काळात वैज्ञानिक युगात बऱ्याच गोष्टी बदलत चाललेल्या आहेत. मात्र काळानुरूप संस्कृतिप्रिय ज्या गोष्टी आपल्याला मिळालेले आहेत. त्यांना वर्तमानात विसरून चालता येणार नाही. आई-वडिलांचा संघर्ष, श्रम, त्यांनी लेकरांसाठी भूतकाळात केलेला जीवाचा आटापिटा वर्तमानात जीवन जगत असताना युवकांनी नजरेसमोर ठेवून स्वतःशी स्वतःचा संघर्ष करून यशोशिखर भेटायला पाहिजे ! त्याचबरोबर मोबाईलचे युगात सायबर क्राईम सर्वत्र भयावह पसरत आहे. त्यातून युवक युतींनी वेळीच सावध व्हायला पाहिजे म्हणजे असामाजिक घडणाऱ्या घटनांवर आळा बसेल असे वक्तव्य मराठी पत्रकार संघटनेचे तालुकाध्यक्ष रमेश चुटे यांनी केले. ते यावेळी अष्टविनायक बहुउद्देशीय शिक्षण संस्था आमगाव द्वारा संचालित साखरीटोला महाविद्यालय साखरीटोला मार्फत पानगाव ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या गंगूटोला या गावात राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे आयोजन करण्यात आले असून उद्घाटनाप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय स्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवी सरस्वती, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करून व फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य तालुका मराठी पत्रकार संघटनेचे सचिव युवा पत्रकार पवन पाथोडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच दीपप्रज्वलक म्हणून प्रा. डी. जी. बघेले स्वामी विवेकानंद महाविद्यालय आमगाव हे होते तर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी स्थानी नामदेव दोनोडे माजी सरपंच, रेखाताई बहेकार अंगणवाडी सेविका, उमेश शिवणकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत “माझ्या भारतासाठी युवाशक्ती” या शिर्षका खाली आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात कोण कोणते उपक्रम राबविले जाणार या विषयी सविस्तर भूमिका प्रास्ताविकेतून महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. संतोष मस्के यांनी ठेवली. राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक हा स्वयं स्फूर्तींने कार्य करणारा असावा त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे युवकांमध्ये सामाजिक रुची निर्माण करण्याचे एक उत्तम व्यासपीठ आहे. या व्यासपीठावरून खरं व्यक्तिमत्व घडण्याची उर्मी युवकांच्या अंगी येत असते. राष्ट्रीय सेवा योजना काल, आज आणि उद्या या विषयक सविस्तर मार्गदर्शन उद्घाटक स्थानावरून युवा पत्रकार पवन पाथोडे यांनी केले. सदर तीन दिवशीय श्रमसंस्कार शिबिरात समाजकार्यात राष्ट्रसंतांची भूमिका, सायबर सुरक्षा, युवा माझ्या भारतासाठी, डिजिटल भारत, मतदार जागृती, व्यक्तिमत्व विकास, ग्रामविकास योजना, अंधश्रद्धा निर्मूलन, सविधान साक्षरता, पर्यावरण संरक्षण, स्वच्छ ग्राम सुंदर ग्राम अशा विविध विषयांवर व्याख्याने तसेच जनजागृती पर कार्यक्रम होणार असून जागृती पर विशेष प्रबोधन गंगुटोला ग्राम वासियांना होणार आहे.
यावेळी कार्यक्रमाचे संचालन प्रा. पिंकी हेमने यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.आचल बावनकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहायक राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुनील गुर्वे, प्रा. विश्वनाथ राऊत, प्रा. राहुल फुंडे, प्रा. गोपाल कोसरे, प्रा. पिंकी हेमणे, प्रा. मोहिनी अग्रवाल, प्रा. रेखा निंबेकर, प्रा. विद्या परतेती, प्रा. आचल बावनकर, प्रा. प्रिती गाते, प्रा. नेहा चूटे, शिक्षकेतर कर्मचारी, उमेश शिवणकर, महेन्द्र दोनोडे, विनायक मेश्राम, प्रमिलाबई कठाने यांनी विशेष परिश्रम घेतले.
