🔷गरजू व गरीब रुग्णांची आरोग्य सेवा खोळबंली
🔷त्यांच्या प्रश्नांकडे यंत्रणेकडून दुर्लक्ष”
साखरीटोला/ गोंदिया (रमेश चुटे)
महाराष्ट्र आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेच्या वतीने पूर्ण राज्यात विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यानुसार गोंदिया जिल्ह्यातील आरोग्य मित्र कर्मचाऱ्यांनी सुद्धा दि. 18 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाचे समोरच बेमुदत कामबंद सुरु केले आहे. त्यांच्या प्रलंबित प्रश्नाकडे सरकारी यंत्रणेकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आरोग्य सेवकांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. आरोग्य सेवकांच्या संपाने आरोग्य विभागाची संपूर्ण यंत्रणा कोलमडली असून गरीब, गरजू रुग्णांना नाहक त्रास सहन करावे लागत आहे.
आरोग्य मित्र गत १२ वर्षांपासून काम करीत आहेत. मात्र, त्यांचा पगार केवळ १२ हजार आहे. त्यांना ‘समान काम समान वेतन’ या धोरणानुसार वेतन मिळावे. ‘आरोग्य मित्रा’च्या वेतनात दरवर्षी १० टक्के वेतनवाढ करण्यात यावी. आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत आयुष्यमान कार्डचे काम आरोग्य सेवकांनी केले. मात्र, याचा अद्यापही मोबदला मिळाला नाही. कोविड महामारीतील अतिरिक्त कामाचा मोबदला देण्यात यावा. एनआरएचएमच्या धरतीवर एसएसएएसमध्ये आरोग्य मित्रांना कायमस्वरूपी नियुक्त करण्यात यावे, यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलक ठाम आहेत.
गोंदिया जिल्हा आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे शिवकुमार पालेवार, मंगला मांढरे, नवल चौधरी, रविंद्र चौखंडरे, सुखदेव भंडारकर, प्रफुल गोंडाने, कोनिका भूते, दामोदर शेंडे, अमोल बोहरे, प्रवीण बिसेन, अमन हरिनखेड़े, अश्विन ऊके, राजू पालेवार, सपना बिसेन, रीना ठाकरे, शिला बावनकर कल्याणी रेवतकर, अर्चना नेवारे, असे 23 कर्मचारी असून संपावर बसले आहेत. पूर्वी आचारसंहिता संपल्यावर आपल्या मागण्या पूर्ण होतील, असे आश्वासन दिले गेले होते. त्यानंतर नवीन सरकार स्थापन झाले आहे, असे म्हणत पुन्हा कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. अखेरीस आरोग्य सेवकांनी बेमुदत संपाचा निर्णय घेतला. राज्य सरकारच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य व गरीब रुग्णांना 5 लाख रुपयांपर्यंचे मोफत उपचार देण्याची योजना सरकारने सुरू केली आहे. त्यासोबतच, आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून देखील रुग्णांना ठराविक रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येतात. मात्र, रुग्णालयात हा लाभ मिळतो का, रुग्णालयात रुग्णांना ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावे लागत होते. त्यामुळेच, या योजनेच्या मार्गदर्शनासाठी व योजना व रुग्णालय यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून आरोग्य मित्रांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, या आरोग्य मित्रांनी मागील पाच दिवसापासून बेमुदत संप पुकारला आहे. शासन त्यांच्या मागण्यांकडे लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
