🔽101 युवकांनी केले रक्तदान..
अखिल विश्व् गायत्री परिवार शाखा किकरीपारचे उपक्रम
साखरीटोला/सालेकसा -: (रमेश चुटे)
अखिल विश्व गायत्री परिवार शांतीकुंज हरीव्दार यांच्या तत्वाध्यानात गायत्री शक्तीपीठ आमगाव शाखा किकरीपार यांच्या वतीने परम वंदनीय माताजी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने मौजा किकरीपार येथे तीन दिवसीय गायत्री महायज्ञ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 26 पासून ते 28 डिसेंबर पर्यंत सतत तीन दिवस कार्यक्रम होणार आहेत. जिल्ह्यातील रुग्णालयांत मोठ्या प्रमाणात रक्ताची चणचण भासत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकी राखत व तरुणांना रक्तदानाविषयी माहिती मिळावी हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून गायत्री परिवार तर्फे दि. 26 रोजी पहिल्यांदिवशी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरात 101 रक्तदात्यांनी रक्तदान करून कार्यक्रमाची सुरुवात केले. गायत्री परिवारच्या कार्यक्रमात तरुण वर्ग पुढे सरसावल्याने रक्ताचा तुटवडा लवकरच कमी होईल. असा आशावाद गायत्री परिवारचे धनराज बिसेन, प्रसादीलाल पटेल, युवा प्रकोष्टचे महेंद्र मोहारे यांनी व्यक्त केले. शिबिरात तपासणी व रक्त संकलन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील रक्त केंद्र अधीक्षक डाँ. विजय बिसेन, व रक्त संक्रमन अधिकारी डाँ. अनमेरी जोसे व यांच्या टीम व्दारे करण्यात आले. उद्या 27 रोजी भव्य मंगल कलश यात्रा आयोजित असून रात्री दीपयज्ञ, 28 रोजी पाच कुंडीय गायत्री महायज्ञ, दिक्षा संस्कार, व महाप्रसाद होणार आहे. वंदनीय माताजी यांच्या जन्म शताब्दी वर्ष कार्यक्रमादरम्यान 24 लाख गायत्री मंत्र लेखन संकल्प पूर्ण होणार आहे. यासाठी 15 विद्यालय, 71 पेक्षा अधिक गावातील गायत्री परिवार साधकांचा समावेश आहे. अखिल विश्व गायत्री परिवार यांच्या नेतृत्वाखाली लोकांमध्ये अध्यात्मिक जागृती, संस्कृतीचे पुनरुज्जीवन आणि सामाजिक सलोखा वाढवणे हा मुख्य उद्देश आहे.




