🔽सकाळी 11.05 नियोजित वेळी लग्न लागणार
🔽८ जोडपी बांधणार रेशीमगाठी
*साखरीटोला-
युवा कुणबी समाज सेवा समिती, साकऱीटोला (सातगांव) यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, १२ एप्रिल २०२६ रोजी हा सोहळा पार पडणार असून, यामध्ये ८ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. विशेष म्हणजे विवाह सोहळ्यात सहभागी वधूंना शासनाच्या ‘शुभमंगल योजने’चा लाभ मिळणार आहे. समितीच्या वतीने सलग 23 वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे. यावर्षीच्या मंडप पूजन व हळदी: ११ एप्रिल २०२६, शनिवार सायं.६ वाजता होणार असून विवाह मुहूर्त: १२ एप्रिल २०२६, रविवार सकाळी ११:०५ वाजता नियोजित वेळी जि.प. हायस्कूल, साकऱीटोला येथील भव्य पटांगण संपन्न होणार आहे. या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. यात प्रामुख्याने खा. प्रफुल्लभाई पटेल, खा. प्रशांत पडोले, आ. संजय पुराम, आ.नानाभाऊ पटोले, माजी खासदार सुनील मेंढे, माजी खासदार अशोक नेते आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भांडारकर यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
युवा कुणबी समाज सेवा समिती तर्फे जय्यत तयारी करण्यात आले असून समितीचे प्रभाकर दोनोंडे, भूमेश्वर मेंढे, कमल बहेकार, रमेश चुटे, युगराम कोरे संतोष बोहरे,पुर्थ्वीराज शिवणकर, अरविंद फुंडे आणि त्यांच्या संपूर्ण टीमने सोहळ्यासाठी कंबर कसली आहे. विवाह सोहळ्याला येणाऱ्या वर-वधू पक्षाकडील पाहुण्यांसाठी आणि निमंत्रितांसाठी उत्तम भोजन, पिण्याचे पाणी आणि आसन व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. महिला समितीच्या सदस्यांकडून पाहुण्यांच्या आदरातिथ्यासाठी विशेष परिश्रम घेतले जात आहेत. “सर्वसामान्यांवरील लग्नाचा आर्थिक भार कमी व्हावा आणि सामाजिक एकोपा वाढावा, हाच या सामूहिक विवाहाचा मुख्य उद्देश आहे, या मंगल प्रसंगी सर्व समाज बांधव व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



