वार्तापत्र- रमेश चुटे साखरीटोला
बदलत्या आधुनिक जगामध्ये कौटुंबिक आणि सामाजिक रचनेला मोठे खिंडार पडताना दिसत आहे. एका आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, येत्या 10 वर्षांत जगातील तब्बल 45 टक्के मुले-मुली अविवाहित राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा आकडा केवळ धक्कादायक नसून पारंपरिक कुटुंबव्यवस्थेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. तरुण पिढीमध्ये विवाहाबद्दल अनास्था का निर्माण होत आहे आणि त्याचे काय परिणाम होतील, याचा सखोल आढावा घेणारे हे वार्तापत्र. मुली लग्न नाकारत असून आजच्या उच्चशिक्षित तरुणींमध्ये विवाहाबाबत कमालीची उदासीनता दिसून येत आहे, यामागे काही ठोस सामाजिक व आर्थिक कारणे असून उच्च शिक्षण आणि करिअरला प्राधान्य देणे आहे. आजच्या घडीला मुली उच्च शिक्षणात आघाडीवर असून आपल्या पायावर उभे राहण्याला करिअरला सर्वोच्च प्राधान्य देत आहेत. त्यांना आर्थिक स्वावलंबन हवे असून, मुली आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यामुळे त्यांना आता उदरनिर्वाहासाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज वाटत नाही. आधुनिक तरुणींना आपले स्वातंत्र्य प्रिय आहे. स्वतःच्या आयुष्याचे निर्णय त्या स्वतः घेण्यास इच्छुक आहेत. आता त्यांना विवाह, मातृत्व, आणि कौटुंबिक बंधने हे आपल्या वैयक्तिक प्रगतीमधील अडथळे वाटत असून अशी एक भावना निर्माण होत असतांना दिसत आहे. ही प्रवृत्ती अशीच कायम राहिल्यास पारंपरिक कुटुंब व्यवस्था आणि सामाजिक रचना पूर्णपणे ढासळू शकते. विवाहाचे प्रमाण घटल्यामुळे भविष्यात जन्मदर कमी होईल आणि वृद्धावस्थेत एकाकीपणाच्या गंभीर समस्या निर्माण होतील. जर आयुष्याच्या शेवटी साथ देणारे, सुख-दुःख वाटून घेणारे कोणीच नसेल, तर मिळवलेली प्रगती, पद आणि पैसा यांचा शेवटी काय उपयोग असणार. असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. यामुळे भविष्यातील कौटुंबिक समस्या अधिक गंभीर होणार आहे. पूर्ण गतीने होत असलेल्या या बदलामुळे पिढ्यानं, पिढ्यांचे गणित पूर्ण पणे बिघडणार आहे. विवाहाचे वय पुढे ढकलल्यामुळे पिढ्यांमधील अंतरावर आणि कौटुंबिक स्थैर्यावर मोठा परिणाम होणार आहे. पूर्वी जेव्हा विवाहाचे वय २० वर्षे होते, तेव्हा एका शतकात (१०० वर्षांत) ५ पिढ्या पाहायला मिळत असत. लग्नाचे वय २५ झाले तेव्हा ४ पिढ्या आणि आता लग्नाचे वय ३० वर्षे किंवा त्याहून अधिक झाल्यामुळे एका शतकात फक्त ३ पिढ्या उरणार आहेत. समाजात सुखी कुटुंबांऐवजी दुःखी आई-वडील आणि एकटे पालक यांचे प्रमाण वाढणार असून संपूर्ण पिढी रिकाम्या वेळेचा आणि एकाकीपणाचा अनुभव घेणार आहे. याला ‘सुशिक्षित समाज’ म्हणायचे की ‘स्वतःचे नुकसान करणारा समाज’ हे वास्तव्य समजण्याची गरज येऊन ठेपली आहे. आज समाजात विसंगती निर्माण झाली आहे. जर ५० जोडप्यांमध्ये फक्त एकच मूल असेल, तर पुढील पिढी कमालीची घटेल. गावे, गल्ल्या आणि वाडे ओस पडणार आहेत. शहरांमध्ये टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत, पण संयुक्त कुटुंब व्यवस्था संपत चालली आहे. नव्या सुनांना ‘फक्त एकच मूल’ हवे असते. सत्य हे आहे की, आता मुले प्रेमाचे प्रतीक राहिलेली नाहीत, तर मुलांना जन्म देणे ही एक जबाबदारी किंवा मोठी मजबुरी झाली आहे. यात मोठी चूक मुलींच्या आई वडिलांची आहे, जे स्वतः २०-२२ व्या वर्षी लग्न करून कुटुंब उभे करू शकले, तेच आता मुलीचे लग्न ३० वर्षांपर्यंत न लावता अभिमान बाळगत आहेत. परिणामी, मुले-मुली नैराश्यात जात आहेत. विवाह हे केवळ एक बंधन नसून तो कुटुंब आणि समाजाचा पाया आहे. संस्कृती, परंपरा आणि पिढ्या पुढे नेण्याचा तो मुख्य मार्ग आहे. आज लग्न करणे, सहकुटुंब राहणे, मुलांना जन्म घालणे हे सर्व ओझे वाटू लागले आहे. मुलांना अतिस्वातंत्र्य देऊन आपण त्यांची समज कमी करत आहोत का यावर आता चिंतन करण्याची गरज निर्माण झाली आहे. मुलांसाठी २५ वर्षे आणि मुलींसाठी २० ते २३ वर्षे हे विवाहासाठी योग्य वय मानले जात होते. पण आज घडीला ते इतिहास झाले आहे. अनेक पालक आपल्या मुलींसाठी योग्य स्थळे शोधत आहेत, परंतु मुलींना विवाहामध्ये रस नसल्यामुळे प्रत्येक प्रस्ताव नाकारला जात आहे. समाजातील मोठ्या घटकाला या बदलाची गंभीरता अजून समजलेली नाही. समाज, कुटुंब आणि वैयक्तिक जीवन यांचा समतोल राखणे हीच खरी प्रगती आहे. कारण कुटुंब नसेल, तर समाज टिकणार नाही! अन्यथा इतिहास लिहील की, “तो एक असा समाज होता, ज्याने स्वतःच स्वतःला संपवले.” करिता सामाजिक जवाबदारी म्हणून वेळेवर जागे होण्याची गरज आहे.



