सुटलेल्या बालकांसाठी ३ नोव्हेंबर रोजी ‘मॉप अप राऊंड’; आशा व अंगणवाडी सेविकांमार्फत शोध सुरू
गोंदिया: जिल्ह्यात राबविण्यात आलेली राष्ट्रीय जंतनाशक मोहीम अत्यंत यशस्वी ठरली असून, जिल्ह्यातील 92.77% बालकांना जंतांपासून सुरक्षा देण्यात आली आहे.जिल्ह्यातील एकूण 3,00,251 पात्र बालकांपैकी 2,78,556 बालकांना जंतनाशक गोळी देण्यात आरोग्य विभागाला यश आले आहे, अशी अधिकृत माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी दिली आहे.
मुलांचे आरोग्य आणि उज्ज्वल भविष्य हे आपल्या सर्वांचे मुख्य ध्येय आहे.मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक वाढीमध्ये पोटातील जंत अडथळा ठरतात.यामुळे मुलांमध्ये कुपोषण, रक्ताची कमतरता (रक्तक्षय) आणि सतत थकवा जाणवणे अशा गंभीर समस्या निर्माण होतात. यावर मात करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली गेल्याचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अरविंदकुमार वाघमारे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मोहिमेदरम्यान औषध घेण्यापासून वंचित राहिलेल्या बालकांचा आशा सेविका व अंगणवाडी सेविकांमार्फत शोध घेतला जात असून, त्यांनी दुसऱ्या ठिकाणी औषध घेतले आहे का, याची तपासणी केली जात आहे.या शोध मोहिमेनंतर सुटलेल्या सर्व बालकांना ३ नोव्हेंबर रोजी आयोजित ‘मॉप अप राऊंड’ मध्ये जंतविरोधी गोळी देण्यात येणार असल्याचे जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.राजेश बेळमकर यांनी दिली आहे.
या मोहिमेत जिल्ह्यातील सर्व ८ तालुक्यांनी उत्तम कामगिरी केली आहे.
तालुकावार अंतिम आकडेवारी-
तालुका पात्र बालके ,औषध दिलेली बालके , टक्केवारी
देवरी 32,501 30,159 92.79%
सालेकसा 22,035 21,196 96.19%
सडक अर्जुनी 25,804 24,644 95.50%
अर्जुनी मोरगाव 34,854 33,016 94.73%
आमगाव 29,277 26,087 89.10%
गोरेगाव 26,981 24,681 91.48%
तिरोडा 36,186 32,925 90.99%
गोंदिया 92,613 85,848 92.70%
एकूण जिल्हा = 3,00,251 2,78,556 92.77% बालकांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आणि त्यांना कुपोषण तसेच रक्तक्षय (ॲनिमिया) पासुन वाचवण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने सर्व शाळा, अंगणवाड्या आणि आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ही मोहीम युद्धपातळीवर राबवली असून ३ नोव्हेंबरला १००% उद्दिष्ट गाठण्याचा मानस आरोग्य प्रशासनाने व्यक्त केला आहे.
पालकांनी आपल्या सुटलेल्या पाल्यांना ३ नोव्हेंबर रोजी जंतनाशक गोळी नक्की द्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांचे नियोजन तर समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक,आरोग्य सहाय्यक,आरोग्य सेवक,आरोग्य सेविका व आशा सेविका यांचे गावपातळीवरची प्रत्यक्ष कामगिरी मोलाची ठरली. त्यास सोबत जिल्हा स्तरीय व तालुका स्तरीय आरोग्य पर्यवेक्षक यांचे पर्यवेक्षण उल्लेखनीय ठरले.
मॉप-अप राऊंडचे महत्त्व:
दि.२७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालयांमध्ये जंतनाशक गोळ्यांचे (अल्बेंडाझॉल) मोफत वाटप करण्यात आले आहे. परंतु, जे लहान मुले किंवा किशोरवयीन मुले त्या दिवशी आजारपणामुळे, सुट्टीमुळे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे गोळी घेण्यापासून वंचित राहिले आहेत, त्यांच्यासाठी दि.३ नोव्हेंबर २०२६ रोजी ‘मॉप-अप राऊंड’ आयोजित करण्यात आला आहे.तरी पालकांनी आपल्या सुटलेल्या पाल्यांना दि.३ नोव्हेंबर रोजी जंतनाशक गोळी नक्की द्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभिजीत गोल्हार यांनी केले आहे.




