अध्यात्म शक्तीला राष्ट्र निर्मितीशी जोडणारे संत

भारतीय संतपरंपरेने अध्यात्मासोबतच समाजप्रबोधन, समता आणि मानवतेची मूल्ये जपली आहेत.या परंपरेला आधुनिक राष्ट्रनिर्मितीची दिशा देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज हे विसाव्या शतकातील एक लोकोत्तर व्यक्तिमत्त्व होते. स्वातंत्र्य मिळविणे हे राष्ट्रनिर्मितीचे अंतिम उद्दिष्ट नसून, स्वतंत्र भारताला समताधिष्ठित, स्वावलंबी, एकात्म आणि समृद्ध बनविणे ही खरी जबाबदारी आहे, याची जाणीव त्यांनी समाजाला करून दिली. म्हणूनच त्यांचे कार्य केवळ संतपरंपरेपुरते मर्यादित न राहता नवभारताच्या उभारणीशी जोडले आज त्यांच्या पुण्यतिथीला त्यांना अभिवादन करताना त्यांनी निर्माण केलेल्या आदर्शावर समाजाने आणि समाजातील संत समुदायाने वाटचाल करणे आवश्यक वाटते.या भारताच्या नवनिर्माणासाठी कोणत्याही काळामध्ये या ठिकाणच्या सज्जनशक्तीने एकत्रित येणे आवश्यक वाटते.

स्वातंत्र्यानंतर संघटन करण्याचा ध्यास

स्वातंत्र्यानंतर भारतासमोर सामाजिक विषमता,धर्माधर्मातील असंतोष, निरक्षरता, ग्रामीण दारिद्र्य, जातिभेद आणि राष्ट्रीय एकात्मतेची आव्हाने होती. या परिस्थितीत समाजाच्या मनावर प्रभाव टाकणाऱ्या संतांनी राष्ट्रनिर्मितीच्या कामात सक्रिय सहभाग घ्यावा, अशी भूमिकातत्कालीन राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी मांडली. या भूमिकेला राष्ट्रव्यापी करण्याचे ध्येय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी घेतले. तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्याशी संबंधित चरित्रपर संदर्भांतूनही राष्ट्रसंतांच्या कार्याला मिळालेल्या राष्ट्रीय मान्यतेचे महत्त्व स्पष्ट होते. राष्ट्रपती भवनातील त्यांच्या खंजिरी भजनाने आणि राष्ट्रभक्तिपर विचारांनी त्यांचे कार्य राष्ट्रीय स्तरावर पोहोचले.

संतांचा प्रभाव केवळ धार्मिक श्रद्धेपुरता न राहता तो लोकशिक्षण, सामाजिक परिवर्तन आणि देशसेवेसाठी उपयोगात यावा, हा त्यांच्या कार्याचा गाभा होता. देशभरातील संतांना व्यापक राष्ट्रहिताच्या कार्यासाठी एकत्र आणण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना १९५६ मध्ये महत्त्वाचे वळण मिळाले. दिल्ली येथे विविध आखाड्यांतील,राज्यातील,धर्मपिठातील धर्माचार्य आणि संतांच्या सहभागातून भारत साधू समाजाची स्थापना झाली. गुरुकुंज आश्रमाच्या जीवनदर्शनविषयक नोंदीनुसार, या संस्थेच्या स्थापनेत राष्ट्रसंतांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि त्यांची प्रथम अध्यक्षपदी एकमताने निवड झाली. संतशक्तीला संघटित सामाजिक कार्याची दिशा देणारा हा प्रयत्न त्यांच्या राष्ट्रनिर्माणविषयक दृष्टिकोनाचा महत्त्वाचा आविष्कार होता. संत कसा असावा. भारताच्या नवनिर्माणात संतांची भूमिका कशी सर्वसमावेशक असावी, याचा वस्तुपाठ राष्ट्रसंतानी आपल्या साहित्यातून घालून दिला आहे.

स्वातंत्र्यलढ्यातून राष्ट्रभक्तीची प्रेरणा

राष्ट्रसंतांचे राष्ट्रकार्य स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुरू झाले नव्हते. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली. १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाच्या काळात त्यांच्या राष्ट्रभक्तिपर रचनांनी जनमानसात स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण केली. चिमूर, आष्टी,यावली या भागात राष्ट्रसंतांच्या शब्दांनी राष्ट्रभक्तीच्या स्फुल्लिंग चेतविले. आते है नाथ हमारे या भजनातील ‘झाडझडुले शस्त्र बनेगी! भक्त बनेगी सेना, पत्थर सारे बॉम्ब बनेगी, नाव लगेगी किनारे ‘ यांसारख्या स्फूर्तिगीतांनी ग्रामीण भागातील जनतेला आंदोलनाशी जोडण्याचे काम केले. ब्रिटिश सत्तेने त्यांना अटक केली आणि तुरुंगवासही भोगावा लागला.

त्यांनी लोकभाषेचा, लोकसंगीताचा आणि त्यांचा गावागावातील जनसंपर्काच्या प्रभावी माध्यमांचा उपयोग राष्ट्रीय जाणीव जागविण्यासाठी केला. त्यांच्या दृष्टीने स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्तता नव्हे; तर समाजातील अन्याय, अज्ञान आणि विषमतेतूनही मुक्तता होती.

ग्रामविकासातून राष्ट्रविकासाचा मार्ग

भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खेड्यांची प्रगती झाल्याशिवाय देशाची सर्वांगीण प्रगती शक्य नाही, ही राष्ट्रसंतांची ठाम धारणा होती. याच विचारातून त्यांनी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. ग्रामस्वच्छता, शिक्षण, श्रमप्रतिष्ठा, सहकार, व्यसनमुक्ती, नैतिकता, स्वावलंबन आणि लोकसहभाग या घटकांचा समन्वय साधणारा हा ग्रामविकासाचा विचार आहे.

गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा ही त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट करणारी ओळ आहे. ग्रामविकास हा केवळ रस्ते, पाणी आणि इमारतींच्या निर्मितीपुरता मर्यादित नसून गावातील माणसांच्या विचारांत, आचरणात आणि परस्पर संबंधांत परिवर्तन घडविण्याची प्रक्रिया आहे, असे त्यांच्या कार्यातून दिसते.

१९३५ मध्ये स्थापन केलेल्या गुरुकुंज आश्रमाच्या माध्यमातून त्यांनी समाजसेवा, सामुदायिक प्रार्थना आणि विधायक उपक्रमांना चालना दिली. अखिल भारतीय श्री. गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून ग्रामोन्नतीचा विचार व्यापक जनसमुदायापर्यंत पोहोचविला. गावकऱ्यांनी स्वतःच्या विकासाची जबाबदारी स्वीकारावी आणि श्रमदानातून सामूहिक प्रगती साधावी, हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा संदेश होता.

संकटकाळातील राष्ट्रसेवा आणि राष्ट्रीय एकात्मता

राष्ट्रनिर्मिती म्हणजे केवळ विकासाच्या योजना नव्हेत, तर संकटाच्या वेळी देशबांधवांच्या मदतीला धावून जाणेही होय. बंगालच्या दुष्काळाच्या काळात, १९६२ मधील चीनच्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर, कोयना भूकंपानंतर आणि १९६५ मधील पाकिस्तानच्या आक्रमणाच्या काळात राष्ट्रसंतांनी मदतकार्य व जनजागृतीच्या माध्यमातून राष्ट्रसेवेचा आदर्श घालून दिला. त्यांचे कार्य अध्यात्म आणि कृती यांच्यातील अंतर मिटविणारे होते.अध्यात्मिक गुरूंनी,संतांनी,अध्यात्मिक प्रबोधनकारांनी समाज जागृती करताना देशाला अन्य कोणत्याही बाबीपेक्षा महत्त्व देणे आणि बंधुता जपणे आवश्यक असल्याचे सांगून जाते.
जात, धर्म, पंथ आणि भाषेच्या पलीकडे जाऊन भारतीय समाजात बंधुभाव निर्माण करणे, हे त्यांच्या राष्ट्रनिर्मितीच्या संकल्पनेचे मूलभूत सूत्र होते. सामुदायिक प्रार्थनेतून त्यांनी सर्व समाजघटकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. या भारतात बंधुभाव नित्य वसु दे…दे वरची असा दे’, ही त्यांची प्रार्थना राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेला अभिव्यक्त करते.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरचे विद्यापीठ गीत हे त्यांचे हेच लोकप्रिय भजन आहे. राज्य घटनेत व्यक्त केलेल्या बंधुता या अपेक्षेला आपल्या प्रबोधनात मांडणारा राष्ट्रसंतांसारखा संत होणे नव्हे. अध्यात्मिक गुरूंनी किती सर्वसमावेशी असावे, याचे उदाहरणही त्यांनी त्यांच्या वाणीतून घालून दिले आहे.

विश्वशांती परिषदेत बंधूभावाचा प्रचार

१९५५ मध्ये जपानमध्ये आयोजित जागतिक धर्मपरिषद आणि विश्वशांतीविषयक परिषदांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी मानवता आणि विश्वबंधुत्वाचा संदेश देशाबाहेरही पोहोचविला. राष्ट्रनिर्मितीचा त्यांचा विचार भारताच्या सीमांपुरता मर्यादित नव्हता; तो विश्वशांतीच्या व्यापक मूल्यांशी जोडलेला होता.संत ज्ञानेश्वराच्या बंधू भावाच्या पसायदानाला त्यांनी आपल्या खंजिरीची साथ दिली.जापान मध्येही त्यांनी विश्वबंधुत्वाचा नारा देत जगातील सतप्रवृत्तींना एकत्रित आणण्याचे जागतिक कार्य केले.

नवभारतासाठी आजही मार्गदर्शक विचार
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनातून जनजागृती केली, संघटनातून समाजसेवेची शक्ती उभी केली आणि ग्रामगीतेतून ग्रामविकासाचा विचार मांडला. संतशक्तीला विधायक राष्ट्रकार्यात सहभागी करून घेणे, सामान्य माणसाला विकासाचा सक्रिय भागीदार बनविणे आणि सामाजिक एकात्मतेतून राष्ट्राची उभारणी करणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये होती.

आज विकसित भारताच्या संकल्पनेत ग्रामविकास, नागरिकांचा सहभाग, सामाजिक एकात्मता आणि स्वावलंबन यांना महत्त्व आहे. या सर्व मूल्यांचा आग्रह राष्ट्रसंतांनी आपल्या कार्यातून अनेक दशकांपूर्वी धरला होता. त्यांच्या पुण्यतिथीला त्यांचे स्मरण करताना त्यांच्या विचारांना केवळ गौरवोद्गारांपुरते मर्यादित न ठेवता ते प्रत्यक्ष कृतीत आणणे आवश्यक आहे.

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या…

अशी जगण्याची माफक अपेक्षा ठेवणारे आणि सामान्यातील सामान्य माणसाच्या आयुष्यातील समाधानांना शोधणारे तुकडोजी महाराज यांचे साहित्य त्यांच्या वैचारिक वारशाला अधोरेखित करते.बंधुभावाने जोडलेला समाज, स्वावलंबी खेडी आणि सेवाभावी नागरिक यांच्या बळावरच नवभारताची भक्कम पायाभरणी होऊ शकते, हा त्यांच्या जीवनकार्याचा आजही प्रेरणा देणारा संदेश आहे.आध्यात्मिक क्षेत्रात काम करणाऱ्या विविध जातीपंथातील संत परंपरेने देखील खरे राष्ट्र निर्माण काय असते.यासाठी राष्ट्रसंतांनी निर्माण केलेले साहित्य राष्ट्रसंतांनी समाजाला दिलेले विचार आणि सामाजिक बंधुता आजही सर्वांना प्रेरणादायी आहे.आज त्यांच्या पुण्यतिथीला त्यांना विनम्र अभिवादन.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: अध्यात्म शक्तीला राष्ट्र निर्मितीशी जोडणारे संत, ID: 31235

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर