जल, जंगल आणि जमीन यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे महान जननायक, आदिवासी समाजाच्या अस्मितेचे प्रतीक आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणारे भगवान बिरसा मुंडा यांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात आदिवासी समाजाच्या योगदानाला विशेष महत्त्व आहे. ब्रिटिश सत्तेच्या अन्यायकारक धोरणांविरोधात, शोषणाविरोधात आणि आदिवासींच्या पारंपरिक हक्कांच्या संरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या महान जननायकांमध्ये भगवान बिरसा मुंडा यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांनी आदिवासी समाजामध्ये स्वाभिमान, एकता, सामाजिक जागृती आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण केली. त्यांचे जीवनकार्य केवळ एका समाजापुरते मर्यादित नसून ते संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी आहे.
जन्म आणि बालपण
भगवान बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी तत्कालीन बिहारमधील (सध्याचे झारखंड राज्य) रांची जिल्ह्यातील उलीहातू या गावात सुगना मुंडा आणि करमी मुंडा यांच्या कुटुंबात झाला. अत्यंत साध्या आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या बिरसा मुंडा यांनी बालपणापासूनच आदिवासी समाजाचे जीवन, परंपरा, संस्कृती आणि त्यांच्यासमोरील सामाजिक व आर्थिक अडचणी जवळून अनुभवल्या.
त्या काळात ब्रिटिश राजवटीने आदिवासींच्या पारंपरिक जमीनधारणेच्या व्यवस्थेत हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली होती. जमीनदार, सावकार आणि कंत्राटदार यांच्या माध्यमातून आदिवासींचे शोषण होत होते. पारंपरिक जमिनीवरील हक्क हिरावून घेतले जात होते. जंगलातील नैसर्गिक साधनसंपत्तीवरील अधिकारांवरही निर्बंध आणले जात होते. या अन्यायकारक परिस्थितीमुळे आदिवासी समाजात असंतोष निर्माण झाला होता. याच परिस्थितीने बिरसा मुंडा यांच्या मनात अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा निर्माण केली.
भगवान बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंतीनिमित्त 15 नोव्हेंबर रोजी गडचिरोली येथे जनजातीय गौरव दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार असून आभासी पध्दतीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव समारंभाचे उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाला राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय आदिवासी विकास मंत्री जुएल ओराम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक वुईके, गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक व वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उपस्थित राहणार आहेत.
सामाजिक जागृती आणि आदिवासी समाजाचे संघटन
भगवान बिरसा मुंडा यांनी केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष केला नाही, तर आदिवासी समाजामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक जागृती घडवून आणण्याचेही महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा आणि सामाजिक कुप्रथांना विरोध केला. स्वच्छता, आरोग्य, नैतिक आचरण, शिक्षण, एकता आणि सामाजिक सुधारणांचे महत्त्व लोकांना पटवून दिले.
आदिवासी समाजाने आपली स्वतंत्र ओळख, परंपरा, संस्कृती आणि स्वाभिमान जपला पाहिजे, यासाठी त्यांनी सातत्याने जनजागृती केली. त्यांच्या विचारांमुळे समाजातील विविध घटक एकत्र आले. त्यांनी आदिवासींमध्ये आत्मविश्वास निर्माण करून त्यांना आपल्या हक्कांसाठी संघटित होण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या अनुयायांनी त्यांना श्रद्धेने ‘भगवान’ आणि ‘धरती आबा’ अर्थात धरतीचे पिता ही उपाधी दिली.
‘उलगुलान’ आंदोलनातून ब्रिटिश सत्तेला आव्हान
ब्रिटिश राजवटीच्या अन्यायकारक धोरणांविरोधात भगवान बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला संघटित करून ऐतिहासिक ‘उलगुलान’ म्हणजेच महान उठावाचे नेतृत्व केले. 1899 ते 1900 या कालावधीत या आंदोलनाने व्यापक स्वरूप धारण केले.
या आंदोलनाचा मुख्य उद्देश आदिवासींच्या पारंपरिक जमिनीवरील हक्कांचे संरक्षण, ब्रिटिश सत्तेच्या शोषणकारी व्यवस्थेला विरोध आणि आदिवासींचे स्वशासन प्रस्थापित करणे हा होता. जल, जंगल आणि जमीन यांवरील आदिवासींचे पारंपरिक अधिकार अबाधित राहावेत, यासाठी त्यांनी संघर्ष केला.
‘आमचे राज्य प्रस्थापित झाले पाहिजे’ ही स्वशासनाची भावना त्यांनी आदिवासी समाजामध्ये रुजवली. त्यांच्या नेतृत्वाखाली मुंडा समाजासह इतर आदिवासी समुदायही एकत्र आले. या आंदोलनामुळे ब्रिटिश प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले. उलगुलान आंदोलन हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासींच्या प्रतिकाराचे महत्त्वपूर्ण पर्व ठरले.
बलिदान आणि संघर्षाचा ऐतिहासिक वारसा
ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या आंदोलनामुळे भगवान बिरसा मुंडा यांना ब्रिटिशांनी 3 मार्च 1900 रोजी अटक केली. त्यांना रांची येथील कारागृहात ठेवण्यात आले. तेथेच 9 जून 1900 रोजी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
त्यांचे आयुष्य अल्प असले तरी त्यांनी केलेले कार्य अत्यंत व्यापक आणि दूरगामी परिणाम करणारे ठरले. त्यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनामुळे आदिवासींच्या जमीन हक्कांच्या प्रश्नाकडे ब्रिटिश प्रशासनाला गांभीर्याने लक्ष द्यावे लागले. पुढे 1908 मध्ये छोटानागपूर कास्तकारी कायदा (Chotanagpur Tenancy Act) अस्तित्वात आला. या कायद्याद्वारे आदिवासींच्या जमिनी बिगरआदिवासींकडे हस्तांतरित होण्यावर निर्बंध घालण्यात आले. आदिवासींच्या पारंपरिक जमीन हक्कांच्या संरक्षणाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण कायदा ठरला.
जनजातीय गौरव दिवस : आदिवासी अस्मितेचा राष्ट्रीय सन्मान
भगवान बिरसा मुंडा यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भारत सरकारने 15 नोव्हेंबर हा दिवस ‘जनजातीय गौरव दिवस’ म्हणून घोषित केला आहे. 12 नोव्हेंबर 2021 रोजी अधिसूचना जारी करून हा निर्णय घेण्यात आला. आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान, त्यांचे बलिदान, संस्कृती, परंपरा आणि देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील भूमिका नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे हा या दिवसामागील प्रमुख उद्देश आहे.
या दिवसाच्या माध्यमातून देशभरातील आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण केले जाते. आदिवासी समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरण, त्यांच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि पारंपरिक ज्ञानपरंपरेचे संवर्धन याबाबत जनजागृती केली जाते.
नव्या पिढीसाठी प्रेरणादायी विचार
भगवान बिरसा मुंडा यांचे जीवनकार्य हे संघर्ष, त्याग, स्वाभिमान, सामाजिक एकता आणि अन्यायाविरुद्धच्या लढ्याचे प्रतीक आहे. त्यांनी आदिवासी समाजाला स्वतःच्या हक्कांची जाणीव करून दिली आणि आपल्या संस्कृतीचे जतन करत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्याचा संदेश दिला.
आजच्या काळातही त्यांचे विचार तितकेच महत्त्वाचे आहेत. आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार, आर्थिक स्वावलंबन, वनहक्क, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण आणि सांस्कृतिक अस्मितेचे जतन या बाबींना प्राधान्य देणे आवश्यक आहे. आदिवासी समाजातील युवक-युवतींनी शिक्षणाच्या माध्यमातून सक्षम होऊन समाजाच्या विकासात सक्रिय योगदान द्यावे, हीच भगवान बिरसा मुंडा यांच्या विचारांना खरी आदरांजली ठरेल.
भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेला स्वाभिमान, एकता, स्वशासन आणि हक्कांच्या संरक्षणाचा संदेश हा केवळ आदिवासी समाजापुरता मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीला न्याय, समानता आणि स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा आहे. त्यांचे कार्य आणि विचार भारतीय इतिहासात सदैव स्मरणात राहतील.
‘जल, जंगल आणि जमीन’ या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांचे जीवनकार्य प्रत्येक पिढीला अन्यायाविरुद्ध लढण्याची आणि आपल्या अस्मितेचे रक्षण करण्याची प्रेरणा देत राहील.
-कैलाश गजभिये
‘उपसंपादक’
जिल्हा माहिती कार्यालय,गोंदिया




