गोंदिया, दि. 27 : बाघ कालवा सल्लागार समितीची बैठक राज्यमंत्री तथा पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथील सभागृहात घेण्यात आली. पालकमंत्री दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
या बैठकीस विधानसभा सदस्य गोंदिया विनोद अग्रवाल, विधानसभा सदस्य आमगाव संजय पुराम, अपर जिल्हाधिकारी गोंदिया, खासदार यांचे प्रतिनिधी पुरुषोत्तम कटरे, समिती सदस्य चुन्नीलाल शहारे व प्रेमसुख कटरे, अधीक्षक अभियंता भंडारा सिंचन मंडळ भंडारा, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग गोंदिया, जिल्हा माहिती अधिकारी गोंदिया, अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण मंडळ गोंदिया, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग गोंदिया, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण विभाग देवरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया, कार्यकारी अभियंता बाघ इटियाडोह पाटबंधारे विभाग गोंदिया, उपविभागीय अधिकारी बाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग गोंदिया व उपविभागीय अधिकारी बाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव उपस्थित होते.
प्रास्ताविकात बाघ प्रकल्पाची माहिती देताना कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले यांनी सांगितले सांगितले की, बाघ प्रकल्पावर एकूण 35 हजार 718 हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्यात आली असून त्यात गोंदिया तालुका 17 हजार 859 हेक्टर, आमगाव तालुका 10 हजार 715 हेक्टर व सालेकसा तालुका 7 हजार 174 हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. हा महाराष्ट्र व मध्यप्रदेश या दोन राज्यांचा आंतरराज्यीय संयुक्त प्रकल्प असून पाण्याचा वाटा महाराष्ट्र राज्य 75 टक्के व मध्यप्रदेश राज्य 25 टक्के आहे.
पाणीसाठ्याची माहिती देताना कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले यांनी सांगितले की, दिनांक 17 नोव्हेंबर 2026 रोजी प्रकल्पात 166.04 दलघमी पाणी शिल्लक आहे. त्यातून बाष्पीभवन व्यय, वहन व्यय व कॅरी ओव्हर वजा जाता 82.63 दलघमी शिल्लक राहते. त्यात महाराष्ट्राचा वाटा 61.97 दलघमी आहे. त्यातून पिण्याच्या योजनांना 7.442 दलघमी, औद्योगिक वापराला 2.93 दलघमी, आपात्कालीन साठा 6.19 दलघमी व गोंदिया शहर व रेल्वे स्टेशनसाठी 51.56 दलघमी पाणी आरक्षित केल्यानंतर सिंचनासाठी केवळ 10.40 दलघमी पाणी शिल्लक राहते. त्यावर फक्त 560 हेक्टर धानाचे सिंचन होऊ शकते. त्यामुळे यावर्षी उन्हाळी हंगामाचे सिंचनासाठी पाणी न देता सदर पाणी पुढील खरीप हंगामाच्या रोवणीसाठी ठेवण्यात यावे, असे त्यांनी सुचविले.
यावर आमदार संजय पुराम यांनी सांगितले की, गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित झाला आहे. पुढील वर्षी पाऊस कमी येण्याचा हवामान तज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाचे पीक घेण्यास थांबून चना, गहू, जवस, लाखोरी ही कमी पाणी लागणारी पिके घ्यावीत. तसेच यावर्षी मोठ्या प्रमाणात कालव्याची दुरुस्ती करण्यात यावी. आमदार विनोद अग्रवाल यांनीही उन्हाळी सिंचनाचा लोभ न करता पाणी राखीव ठेवले तर पुढील खरीप हंगामाचे पूर्ण सिंचन होऊ शकते, असे सांगितले. यावर्षीचा उन्हाळा तीव्र राहणार असल्याने पिण्याच्या पाण्याची गरज मोठी भासणार आहे. त्यामुळे कालव्याची दुरुस्तीची कामे तात्काळ पूर्ण करावीत, जेणेकरून पुढील हंगामात पाणी टेलपर्यंत सुरळीत पोहोचेल, अशी सूचना त्यांनी केली.
खासदार यांचे प्रतिनिधी पुरुषोत्तम कटरे यांनी उन्हाळी सिंचनासाठी पाणी देण्यात येईल काय, अशी विचारणा केली असता कार्यकारी अभियंता सोनाली सोनुले यांनी पिण्यासाठी व टंचाईसाठी पाणी जास्त प्रमाणात आरक्षित झाल्याचे सांगितले. समिती सदस्य चुन्नीलाल शहारे यांनी कालीमाटी शाखेअंतर्गत उन्हाळी धानाच्या पिकासाठी पाणी देण्याची मागणी केली. परंतु पाणीसाठा कमी असल्याने ते शक्य नसल्याचे सांगण्यात आले. त्यावर त्यांनीही कालव्याची दुरुस्ती लवकरात लवकर हाती घेण्याची सूचना केली. अपर जिल्हाधिकारी गोंदिया यांनीही पाण्याचे काटेकोर नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गोंदिया यांनी सांगितले की, अल निनोच्या प्रभावामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांनी उन्हाळी धानाकडे न जाता कडधान्य, मका, मोहरी पिके घ्यावीत. मका हा उन्हाळी धानाला पर्याय ठरू शकतो. यावर आमदार संजय पुराम यांनी कडधान्य बियाणे लवकरात लवकर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना कृषी विभागास दिल्या.
पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी जलसंधारणाच्या कामांवर भर द्यावा, जलतारा सारखे प्रकल्प जिल्ह्यात राबवावेत व त्यासाठी सीएसआर व एन.जी.ओ. ची मदत घ्यावी, अशा सूचना दिल्या. ज्या शेतकऱ्यांकडे स्वतःचे सिंचनाचे साधन आहे त्यांना त्यांच्या सोईनुसार सिंचन करू द्यावे, असेही त्यांनी सांगितले. या नियोजनास अध्यक्ष इंद्रनील नाईक व सर्व सदस्यांनी मान्यता दिली.




