राज्यात यावर्षी अलनिनोच्या पार्श्वभूमीवर दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात दुष्काळाचे सावट आहे. पीक हाती येण्याच्या काळात उन्हामुळे वाळून गेलेल्या पिकांचे पंचनामे सुरु आहेत. दरवर्षी या काळात हिरवीगार दिसणारी शेती दुष्काळामुळे काळी-पिवळी दिसू लागली आहेत. वातावरणातील बदलांमुळे निर्माण झालेली दुष्काळ स्थिती शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारी आहे. अशावेळी दुष्काळावर मात करण्यासाठी विहीर खोदण्यापूर्वी स्थानिक किंवा जिल्हास्तरावर उपलब्ध भूजल वैज्ञानिकांचा सल्ला घ्यावा. कारण शेती, पिण्याचे पाणी आणि इतर दैनंदिन गरजांसाठी भूजल हा महत्त्वाचा स्रोत आहे.
विहीर खोदण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी?
विंधन विहिरीच्या तुलनेत शक्य असेल तेथे पारंपरिक विहिरींना प्राधान्य द्यावे. विहिरीच्या जागेची निश्चिती करताना भूजल वैज्ञानिकांचे मार्गदर्शन घ्यावे. शक्य असल्यास भूभौतिकीय पद्धतींचा वापर करून भूजल उपलब्धतेचा अंदाज घ्यावा. यामुळे विहिरीसाठी योग्य जागा निवडण्यास मदत होते. शक्यतो उन्हाळ्याच्या कालावधीत विहीर खोदण्याचे नियोजन करावे. या काळात भूजलपातळी तुलनेने कमी असल्यामुळे जमिनीखालील पाण्याची स्थिती समजण्यास मदत होते. विहीर खोदताना पाण्याचा अडथळा कमी असल्याने काम करणेही सुलभ होऊ शकते. विहिरीची खोली ठरवताना परिसरातील भूगर्भरचना आणि जलधरांची खोली विचारात घ्यावी. अधिक खोलीची विहीर खोदल्याने वर्षभर मुबलक पाणी मिळेलच, असे नाही. त्यामुळे प्रत्यक्ष भूजल परिस्थितीचा अभ्यास करूनच खोली निश्चित करावी.
विहिरीचे बांधकाम करताना स्थानिक पातळीवर उपलब्ध बांधकाम साहित्याचा वापर करावा. जमिनीचा प्रकार, खडकांची रचना, विहिरीचा व्यास आणि खोली यांचा विचार करून सुरक्षित व मजबूत बांधकामाची पद्धत निवडावी.
विहिरीसाठी योग्य स्थळ कसे निवडावे?
विहिरीच्या स्थळाची निवड करताना परिसरातील नैसर्गिक भू-आकार आणि पाण्याच्या प्रवाहाची दिशा महत्त्वाची ठरते. साधारणपणे पुढील ठिकाणांचा अभ्यास करून विहिरीसाठी योग्य जागा निश्चित करता येते.
• दोन नाले एकत्र येतात त्या परिसरातील भूभाग.
• नदी किंवा नाल्यांच्या किनाऱ्यालगत असलेले गाळयुक्त प्रदेश.
• भूपृष्ठावरील सखल भाग, जेथे मातीचा थर किमान ३० सेंटीमीटर आणि झिज झालेल्या खडकाचा थर सुमारे ५ मीटर असू शकतो.
• नदी-नाल्यांच्या जुन्या प्रवाहांचे प्रदेश, जेथे रेती व गोलाकार गोटे आढळतात.
• नदी-नाल्यांच्या वळणांजवळील भूभाग आणि नैसर्गिक ओलावा असलेली ठिकाणे.
• जास्त झाडे-झुडपे असलेल्या परिसरातील योग्य भूगर्भीय रचना असलेली ठिकाणे.
मात्र, केवळ झाडांची संख्या किंवा जमिनीवरील ओलावा पाहून विहिरीसाठी जागा निश्चित करू नये. भूगर्भातील खडकांची रचना, जलधरांची स्थिती आणि भूजल वैज्ञानिकांच्या निरीक्षणांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.
कोणत्या ठिकाणी विहीर खोदणे टाळावे?
भूपृष्ठावरच कठीण पाषाण दिसत असेल, डोंगरकडा किंवा टेकडीवर जागा असेल अथवा मातीचा थर ३० सेंटीमीटरपेक्षा कमी असेल, तर अशा ठिकाणी विहीर खोदण्यापूर्वी विशेष अभ्यास करावा. झिज झालेल्या खडकाचा थर कमी असलेल्या भागात भूजल साठवणुकीची क्षमता मर्यादित असण्याची शक्यता असते.
सभोवतालच्या विहिरींचे उभे छेद, नाल्यांच्या काठावरील खडकांची रचना आणि भूभागाचा उतार यांचा अभ्यास केल्यास जमिनीखालील खडकांच्या थरांची माहिती मिळू शकते. त्यामुळे विहीर खोदण्याचा निर्णय घेताना स्थानिक परिस्थितीचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.
दख्खनच्या पठारी भागातील विहिरी
दख्खनच्या पठारी प्रदेशात विहिरीचा साधारण व्यास ३ ते ५ मीटर ठेवण्याचा विचार करता येतो. या भागात सच्छिद्र, झिज झालेल्या तसेच भेगा आणि तडे असलेल्या खडकांच्या थरांमधून भूजल उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे विहीर खोदताना शक्यतो पहिल्या जलधराची रचना आणि त्यातील पाण्याची उपलब्धता समजून घ्यावी.
या प्रदेशात अपरिवृध्द जलधर साधारणतः २० ते २५ मीटर खोलीपर्यंत आढळू शकतो. मात्र, ही खोली सर्व ठिकाणी सारखी नसते. विहीर खोदताना लाल मातीसारखा रेड बोले (Red Bole) थर आढळल्यास त्यानंतरचा खडक आणि भूजलाची स्थिती तपासावी. केवळ हा थर लागला म्हणून विहीर खोदण्याचे काम थांबवू नये.
खडकांमधील भेगा व तड्यांच्या आधारे भूजल उपलब्धतेत वाढ होऊ शकते. योग्य भूगर्भीय परिस्थितीत विहिरीला आडवे बोअर घेतल्यास अतिरिक्त पाणी मिळण्याची शक्यता असते. मात्र, यासाठी तांत्रिक तपासणी आवश्यक आहे. उंच पठारी भागात झिज झालेल्या खडकाचा थर कमी आणि भूजलपातळी खोल असू शकते. अशा ठिकाणी खोल जलधरापर्यंत विहीर घेण्याचा निर्णय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावा.
साधारणतः ६० मीटरपेक्षा अधिक खोलीवरील काही परिवृध्द जलधरांमधून कमी पाणी मिळू शकते. तथापि, तडायुक्त बेसाल्ट खडकात भूजल उत्पादनक्षमता चांगली असण्याची शक्यता असते. त्यामुळे केवळ खोलीवरून विहिरीची पाणी देण्याची क्षमता निश्चित करता येत नाही.
आर्कियन खडकांच्या प्रदेशातील विहिरी
ग्रॅनाइट आणि नीस यांसारख्या आर्कियन खडकांच्या प्रदेशात विहिरीचा साधारण व्यास ३ ते ५ मीटर ठेवण्याचा विचार करता येतो. या भागात झिज झालेल्या खडकांपासून तयार झालेल्या उथळ जलधरांमध्ये भूजल साठलेले असू शकते. तसेच भेगा व तडे असलेल्या खडकांमधूनही पाणी उपलब्ध होऊ शकते.
या खडकांमध्ये झीज कमी झालेली असल्यास झिजलेल्या थराची जाडी मर्यादित असू शकते. त्यामुळे अपरिवृध्द जलधराच्या खोलीपर्यंत विहीर खोदण्याचे नियोजन करावे. त्याखालील जलधरांमध्ये पाणी उपलब्धतेचे प्रमाण कमी असू शकते. म्हणूनच या भागात विहिरीची खोली निश्चित करण्यापूर्वी भूगर्भीय परिस्थितीचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो.
जलोढ आणि गोंडवाना खडकांच्या प्रदेशातील विहिरी
जलोढ प्रदेश तसेच गोंडवाना खडकांच्या भागात विहिरीचा साधारण व्यास २ ते ४ मीटर ठेवण्याचा विचार करता येतो. जलोढ प्रदेशात रेती व गोटे असलेल्या थरांमध्ये, तर गोंडवाना खडकांच्या प्रदेशात वालुकाश्म खडकांमध्ये भूजल उपलब्ध होण्याची शक्यता असते. या भागात अपरिवृध्द जलधर साधारणतः १५ ते २० मीटर खोलीपर्यंत आढळू शकतो. जलोढ प्रदेशात विहीर खोदताना चिकणमातीचा थर लागल्यास त्याची भूगर्भीय स्थिती तपासून पुढील खोदकामाचे नियोजन करावे.
पूर्णा नदीच्या जलोढ प्रदेशात रेती व गोटे असलेले नवीन जलोढ थर साधारणतः ८० मीटर खोलीपर्यंत आढळू शकतात. हे थर विहिरींसाठी उपयुक्त ठरू शकतात. त्याखालील जुन्या चिकणमातीयुक्त जलोढ थरांमध्ये भूजल उपलब्धता कमी असण्याची शक्यता असते. तसेच कामठी वालुकाश्म खडकांमध्ये काही ठिकाणी चांगली भूजल उत्पादकता आढळू शकते.
गोंडवाना खडकांच्या समूहात अपरिवृध्द जलधराखाली परिवृध्द जलधर उपलब्ध असल्यास विहिरीसोबत विंधन विहिरीची (Dug-cum-Borewell) रचना उपयुक्त ठरू शकते. मात्र, त्यासाठी संबंधित ठिकाणची भूगर्भीय रचना आणि जलधरांची स्थिती तपासणे आवश्यक आहे.
विहिरीचे बांधकाम आणि भूजल संरक्षण
विहिरीचे बांधकाम करताना सुरक्षितता, पाण्याचा नैसर्गिक पाझर आणि पाण्याची गुणवत्ता यांना प्राधान्य द्यावे. संबंधित भूगर्भीय परिस्थितीनुसार सिमेंट काँक्रिटचे बांधकाम करता येते. विहिरीच्या भिंतींमध्ये पाण्याचा पाझर होण्यासाठी आवश्यक छिद्रे ठेवण्याची पद्धतही काही ठिकाणी उपयुक्त ठरते. मात्र, छिद्रांची रचना आणि बांधकामाची पद्धत स्थानिक माती व खडकांच्या प्रकारानुसार तांत्रिकदृष्ट्या निश्चित करावी.
विहिरीमध्ये गाळ येऊ नये, भिंतींची स्थिरता कायम राहावी आणि पाण्याचे प्रदूषण होऊ नये, यासाठी योग्य बांधकाम व देखभाल आवश्यक आहे. भूजल उपलब्धतेबरोबरच पाण्याची गुणवत्ता टिकविणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
शास्त्रीय पद्धतीने विहीर खोदणे काळाची गरज
विहीर खोदण्यासाठी केवळ पारंपरिक अनुभवावर अवलंबून न राहता भूगर्भरचना, जलधरांची खोली, खडकांमधील भेगा, परिसरातील विहिरींची स्थिती आणि भूजल वैज्ञानिकांचा सल्ला यांचा एकत्रित विचार करावा. प्रत्येक भागातील भूगर्भीय परिस्थिती वेगवेगळी असल्यामुळे विहिरीचा व्यास, खोली आणि बांधकामाची पद्धत स्थानिक परिस्थितीनुसार निश्चित करावी.
योग्य स्थळाची निवड, शास्त्रीय सर्वेक्षण आणि नियोजनबद्ध बांधकाम यांच्या माध्यमातून भूजलाचा कार्यक्षम वापर करण्यास तसेच पाणीटंचाईच्या काळात पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते. जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया




