सुपर अल निनो व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुढील आठ महिन्यांचे पाणी नियोजन करा : पालकमंत्री इंद्रनील नाईक

गोंदिया, दि. 21 : सुपर अल निनो आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांना पिण्याचे पाणी तसेच रब्बी हंगामासाठी शेतीचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावे, यासाठी पुढील आठ महिन्यांचे काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले.
टंचाई निवारणार्थ उपाययोजना व त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात आज जिल्हा नियोजन भवन येथे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर, खासदार राजेंद्र जैन, सर्वश्री आमदार राजकुमार बडोले, विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी मंदार पत्की, मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित चंद्रा दोंतुला, पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपवनसंरक्षक पवनकुमार जोंग यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नवीन बोअरला परवानगी नको
भूजल पातळीचा विचार करून नवीन बोअरवेलला परवानगी देऊ नये, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री नाईक यांनी दिल्या. उपलब्ध पाण्याचा सुयोग्य वापर करणे आवश्यक असून, नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नाले व तलाव खोलीकरण तसेच जलसंधारणाची कामे हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. जलसंधारणाची कामे सुरू करण्यापूर्वी संबंधित लोकप्रतिनिधींशी चर्चा करून त्यांचे सहकार्य घ्यावे, असेही त्यांनी सांगितले.
पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य
जिल्ह्यातील ग्रामीण, शहरी तसेच नगरपंचायत क्षेत्रातील पाणीटंचाईच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा बैठकीत घेण्यात आला. पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन पुढील आठ महिन्यांसाठी पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने नियोजन करावे. जिल्ह्यातील सर्व मोठे व मध्यम प्रकल्प, त्यातील सद्यस्थितीतील पाणीसाठा तसेच आरक्षित पाण्याची माहिती पालकमंत्र्यांनी जाणून घेतली.
रब्बी हंगामासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होईल, याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले. इटियाडोह प्रकल्प, धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प, गोंदिया पाटबंधारे विभागांतर्गत येणारे प्रकल्प तसेच कटंगी मध्यम प्रकल्प यातील पाणीसाठा व आरक्षित पाण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. पुढील आठ महिन्यांसाठी आवश्यक पाणी आरक्षित ठेवण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
बोदलकसा धरणातील पाणीसाठ्याचे नियोजन
बोदलकसा धरणातील पाळ तुटल्यामुळे पाणी वाहून गेले असून, यामुळे कोणतीही जीवित अथवा वित्तीय हानी झाली नसली तरी धरणातील पाण्याची पातळी कमी झाली आहे. आगामी दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करावे आणि धरणाचे आवश्यक काम पूर्ण करण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश
पाणीटंचाई तसेच कीडरोगामुळे पिकांचे नुकसान झाले असल्यास त्याचे योग्य पद्धतीने पंचनामे करावेत, असे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. लोकप्रतिनिधींनीही त्यांच्या मतदारसंघातील संभाव्य पाणीटंचाईची परिस्थिती बैठकीत मांडली. आगामी काळात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्यास त्याचा शेतकरी आणि नागरिकांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आतापासूनच प्रभावी नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
चारा नियोजन
जिल्ह्यात सध्या चारा टंचाई नसून चारा छावणी सुरू करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिली. जिल्ह्याबाहेर चारा घेऊन जाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असल्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
रब्बी हंगामात चारा उत्पादन वाढावे यासाठी शेतकऱ्यांना वैरण बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी 30 लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून 50 लाख रुपयांचे वैरण बियाणे वाटप प्रस्तावित आहे. विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पांतर्गत 6.51 लाख रुपयांचे वैरण बियाणे वाटप करण्यात आले असून, आणखी 2.63 लाख रुपयांचे बियाणे वाटप करण्यात येणार आहे. वनक्षेत्रातील उपलब्ध चारा नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबतही उपाययोजना करण्यात येणार आहेत. परिस्थितीनुसार ज्वारी, बाजरी, मका यांसारख्या कमी पाण्यात आणि जलद वाढणाऱ्या वैरण पिकांच्या बियाण्यांचे वाटप करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
भूजल पातळी तपासण्यावर भर
भूजल पातळीचा आढावा घेताना उपसा झालेल्या भागातील विहिरींचीही तपासणी करावी, अशी सूचना लोकप्रतिनिधींनी केली. सध्या ठराविक विहिरींमधून भूजल पातळीची तपासणी केली जात आहे. मात्र, या विहिरींचा शेती किंवा अन्य कामांसाठी वापर होत नसल्याने भूजल पातळीचे वस्तुनिष्ठ चित्र मिळण्यासाठी वापरात असलेल्या विहिरींचीही तपासणी करावी, असे निदर्शनास आणून देण्यात आले.
जल जीवन मिशनच्या कामांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश
जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात 172 कामे झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या कामांची प्रत्यक्ष पडताळणी करून निश्चित किती कामे पूर्ण झाली आहेत, किती कामे प्रलंबित आहेत आणि त्यांची सद्यस्थिती काय आहे, याचा अहवाल तयार करावा. हा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर करावा, असे निर्देश देण्यात आले.
धान खरेदी केंद्रे सुरू
धान खरेदी केंद्रांबाबतही बैठकीत विचारणा करण्यात आली. आजपासून धान खरेदी केंद्रे सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली.
सध्याची संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता पाणी, चारा, शेती आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांबाबत आवश्यक उपाययोजना वेळेत पूर्ण करून टंचाईची परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी यावेळी दिले.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: सुपर अल निनो व दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पुढील आठ महिन्यांचे पाणी नियोजन करा : पालकमंत्री इंद्रनील नाईक, ID: 31187

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर