गोंदिया, दि. 28 : यंदा संभाव्य दुष्काळ व टंचाईच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हा प्रशासनाने पशुधन वाचवण्यासाठी अगोदरच चारा व पाणी आराखडा 2026-27 तयार केला आहे.
21 व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यातील 4.78 लाख पशुधनाला जगवण्यासाठी दररोज 1.11 कोटी लिटर पाणी व सुमारे 1980 मे.टन चाऱ्याची गरज भासणार असल्याचे या आराखड्यात नमू जिल्ह्यात 4.78 लाख पशुधन – पाण्याची गरज
21 व्या पशुगणनेनुसार जिल्ह्यात एकूण 4,78,148 पशुधन आहे. यात 2,47,310 गायवर्ग व म्हैसवर्ग, 33,724 लहान पशुधन वर्ग व 1,97,114 शेळ्या-मेंढ्या आहेत.
टंचाई काळात शासनाच्या निकषानुसार मोठ्या जनावराला 40 लिटर, लहान जनावराला 15 लिटर व शेळी-मेंढीला 4 लिटर पाणी प्रतिदिन लागते. त्यानुसार जिल्ह्याला दररोज 1,11,86,716 लिटर (1.11 कोटी) पाण्याची गरज आहे.
तालुकानिहाय विचार करता सर्वाधिक पाण्याची गरज गोंदिया तालुक्यात 27,36,854 लिटर, तिरोडा 22,47,107 लिटर, गोरेगाव 12,37,142 लिटर लागणार आहे. तर अर्जुनी मोर तालुक्यात सर्वात कमी 5,81,387 लिटर गरज आहे.
तालुकानिहाय पशुधन स्थिती
तिरोडा – 1,02,485 (जिल्ह्यात सर्वाधिक), गोंदिया – 1,12,330, गोरेगाव – 50,104, आमगाव – 49,204, सालेकसा – 38,357, देवरी – 53,715, सडक अर्जुनी – 43,532 व अर्जुनी मोर – 28,421.
चाऱ्याची गरज व उपलब्धता
प्रशासनाच्या निकषानुसार :
– गाय व म्हैस – 6 किलो प्रतिदिन
– लहान वर्ग – 3 किलो प्रतिदिन
– शेळी व मेंढी – 2 ते 3 किलो प्रतिदिन
यानुसार जिल्ह्याला प्रतिदिन 1979.262 मे.टन व प्रतिमहिना 59,377.86 मे.टन चाऱ्याची गरज आहे.
याच्या तुलनेत बांधावरील वैरण, वनक्षेत्रातील चारा, पडीत जमिनीवरील गवत, कृषी पिकांचे अवशेष व वैरण विकास योजनेतून मिळणारा चारा मिळून जिल्ह्यात एकूण 3,99,476.833 मे.टन चारा उपलब्ध होणार आहे. ही उपलब्धता गरजेपेक्षा जास्त दिसत असली तरी उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची मोठी टंचाई भासते, त्यासाठी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.
दुष्काळ नियोजनासाठी प्रशासनाची 5 कलमी उपाययोजना
रब्बी हंगामात चारा उत्पादन वाढवण्यासाठी 30 लाख रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून 50 लाख रुपयांचे वैरण बियाणे वाटप प्रस्तावित आहे.
विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पातून आतापर्यंत 6.52 लाख रुपयांचे बियाणे वाटप केले असून आणखी 2.63 लाख रुपयांचे बियाणे वाटप करण्यात येणार आहे.
वन विभागाच्या सहकार्याने वनक्षेत्रामधील गवत व चारा उपलब्ध करून घेण्याचे नियोजन.
ज्वारी, बाजरी, मका व बरसीम यासारख्या कमी पाण्यात व जलद वाढणाऱ्या व जास्त उत्पादन देणाऱ्या वैरण बियाण्यांचे शेतकऱ्यांना मोफत वाटप.
पशुधनासाठी गावोगावी तात्पुरते हौद, टँकर व पशुसाठी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या भरण्याचे नियोजन.
एकूणच दुष्काळात मनुष्याबरोबरच पशुधनाचेही हाल होणार नाही याची दक्षता घेण्यात आली आहे. त्यामुळे चारा छावण्या उघडण्याची वेळ येऊ नये म्हणून प्रशासनाने ऑक्टोबरमध्येच हा आराखडा तयार ठेवला असून तालुका स्तरावर पशुसंवर्धन विभागाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
– जिल्हाधिकारी मंदार पत्की
नुकत्याच झालेल्या टंचाई निवारणार्थ आढावा बैठकीत सर्वोतपरीने विचार करून जिल्हा नियोजनातून अतिरिक्त निधीचे नियोजन केलेले आहे.
राज्यशासनामार्फत येत्या काळात राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरही लक्ष आहे. जिल्ह्यात नागरिक, शेतकरी आणि पशुधनाचीही काळजी घेण्यात आली आहे.
– पालकमंत्री इंद्रनील नाईक



