शिक्षक समितीच्या आंदोलनाचा दणका! ७५ टक्के मागण्या आठ दिवसांत निकाली काढण्याचे प्रशासनाचे आश्वासन

जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात दोन तास मॅरेथॉन चर्चा; २९ ऑक्टोबरचे सत्याग्रह व धरणे आंदोलन स्थगित

गोंदिया, दि. २८ ऑक्टोबर २०२६ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शिक्षकांच्या विविध प्रलंबित सेवाविषयक, वेतनविषयक आणि शाळांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित मागण्यांसाठी सातत्याने सुरू असलेल्या पाठपुराव्याला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. समितीच्या आंदोलनाची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत तब्बल दोन तास सविस्तर चर्चा झाली. यावेळी सुमारे ७५ टक्के मागण्या आठ दिवसांत निकाली काढण्याबाबत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली असून, तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे २९ ऑक्टोबर रोजी नियोजित एकदिवसीय सत्याग्रह व धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय शिक्षक समितीने घेतला आहे.

जिल्हा परिषद गोंदियाचे अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेशजी हर्षे आणि शिक्षणाधिकारी पवन खंडारे यांच्या पुढाकाराने आयोजित या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी झेनिथ दोंदुला, मुख्य लेखा व वित्त अधिकारी पंधरे, उपशिक्षणाधिकारी मोटघरे, प्रशासन अधिकारी सौरभ अग्रवाल यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांची वस्तुस्थिती मांडत त्यावर कालबद्ध निर्णय घेण्याची मागणी केली.प्राथमिक शिक्षकांना एकस्तर पदोन्नतीअंतर्गत S-14 वेतनश्रेणी लागू करणे, २१ एप्रिल २०२६ च्या आदेशावरील स्थगिती उठविण्यासाठी कार्यवाही करणे आणि वेतनातील तफावत दूर करणे, या महत्त्वाच्या मागणीवर सकारात्मक चर्चा झाली. संबंधित प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आला असून, चार दिवसांत आदेश निर्गमित करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देण्यात आले. थकबाकी मार्च महिन्यापूर्वी मिळवून देण्यासाठीही समिती पाठपुरावा करणार आहे.१२ व २४ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना मूळ रुजू दिनांकापासून चटोपाध्याय व निवडश्रेणीचा लाभ देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. यासंदर्भात लवकरच शुद्धिपत्रक काढण्याचे आश्वासन देण्यात आले. तसेच चटोपाध्यायची १०० टक्के प्रलंबित प्रकरणे याच आठवड्यात निकाली काढण्याची ग्वाही प्रशासनाने दिली.निवडश्रेणीच्या यादीत वंचित राहिलेल्या १९ शिक्षकांसह पात्र शिक्षकांना लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. प्रत्येक वर्षनिहाय यादी तयार करून पंचायत समित्यांकडून आवश्यक माहिती मागविण्यात येत आहे. पदवीधर विषय शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ, तसेच उर्वरित प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याबाबतही चर्चा.
आदिवासी उपाययोजनेत वेळोवेळी समाविष्ट झालेल्या गावांमध्ये कार्यरत शिक्षकांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ मिळावा, या मागणीसंदर्भातील प्रस्ताव उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला आहे. संबंधित आदेश निर्गमित करण्यासाठी शिक्षणाधिकारी स्वतः प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

शाळांमधील स्वयंसेवकांचे मानधन आणि कालावधी वाढविण्याच्या मागणीवर चर्चा झाली. यासाठी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून, संबंधित फाइल शिक्षण विभागाकडून सादर करण्यात येणार आहे. ज्या शाळांमध्ये नवीन शिक्षक अद्याप रुजू झालेले नाहीत, त्या शाळांतील स्वयंसेवकांचा कालावधी वाढविण्याबाबतही कार्यवाही केली जाणार आहे.बैठकीत शिक्षकांच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीची प्रलंबित देयके, सेवासातत्याची प्रकरणे, अतिरिक्त घरभाडे भत्त्याची थकबाकी, GPF ऑनलाइन करणे, शाळांना १६व्या वित्त आयोगातून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे आणि नवनियुक्त शिक्षकांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी शिबिर आयोजित करणे या मुद्द्यांवर चर्चा झाली.अर्जुनी मोर तालुक्यासह विविध तालुक्यांतील सन २०२२-२३ पासून प्रलंबित पोषण आहार देयकांसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले. मार्च महिन्यात तीन वर्षांची अर्हताकालीन सेवा पूर्ण करणाऱ्या शिक्षकांच्या नियमित वेतनश्रेणीच्या प्रस्तावांची जानेवारीतच मागणी करून मार्चमध्ये लाभ देणे, एप्रिल महिन्यातील स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षिसाची रक्कम देणे, नावात बदलासंबंधीची प्रकरणे तातडीने निकाली काढणे आणि ‘माहितीचा शनिवार’ अंतर्गत इतर दिवशी कमी प्रमाणात माहिती मागविणे, या विषयांवरही सकारात्मक चर्चा झाली.जिल्हा परिषद शिक्षकांना सन्मानपूर्वक वागणूक देण्याबाबत संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देण्याचे आश्वासनही प्रशासनाकडून देण्यात आले.
शिक्षक समितीच्या मागण्यांवर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याने २९ ऑक्टोबर २०२६ रोजी नियोजित सत्याग्रह व धरणे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. ही स्थगिती म्हणजे संघर्षाची समाप्ती नसून, प्रशासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होते की नाही, यावर समिती बारकाईने लक्ष ठेवणार आहे.
बैठकीत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष लायकरामजी भेंडारकर, उपाध्यक्ष सुरेशजी हर्षे, मुख्य कार्यकारी अधिकारी झेनिथ दोंदुला, जिल्हा परिषद पदाधिकारी सदस्य रचनाताई गहाणे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी पंधरे, शिक्षणाधिकारी पवन खंडारे, उपशिक्षणाधिकारी मोटघरे आणि प्रशासन अधिकारी सौरभ अग्रवाल यांचे शिक्षक समितीच्या वतीने आभार मानण्यात आले.

या बैठकीला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार, सरचिटणीस संदीप मेश्राम, जिल्हानेते एच. एस. बिसेन, कोषाध्यक्ष उत्तम टेंभरे, कार्याध्यक्ष मुकेश रहांगडाले, जिल्हा पदाधिकारी अशोक बिसेन, राजेंद्र बोपचे, संघटक राज कडव, यू. जी. रहांगडाले, शोभेलाल ठाकूर, दिलीप लोदी, तारेंद्र टेंभूरणे, ओमप्रकाश नंदनवार, तालुका उपाध्यक्ष ओ. बी. मस्के, जिल्हामार्गदर्शक मंगेश पर्वते, गणेश कांगणे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व शिक्षक बांधव उपस्थित होते.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: शिक्षक समितीच्या आंदोलनाचा दणका! ७५ टक्के मागण्या आठ दिवसांत निकाली काढण्याचे प्रशासनाचे आश्वासन, ID: 31218

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर