नक्षलमुक्त गोंदिया जिल्ह्याचा राष्ट्रीय गौरव! ‘राष्ट्रीय एकता दिना’निमित्त गोंदियातील 50 नागरिकांचे प्रतिनिधी मंडळ एकता नगर, गुजरात येथे रवाना

गोंदिया, दि.29 : “नक्षलवादाच्या छायेतून विकासाच्या मुख्य प्रवाहाकडे वाटचाल करणाऱ्या गोंदिया जिल्ह्याला राष्ट्रीय स्तरावर सन्मानाची संधी; स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या भव्य राष्ट्रीय एकता दिन सोहळ्यात नागरिकांचा सहभाग.”
भारताचे लोहपुरुष आणि देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुजरात राज्यातील एकता नगर, केवडिया येथे भव्य ‘राष्ट्रीय एकता दिन’ समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्याचा संदेश देणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी केंद्र शासनाच्या विशेष उपक्रमांतर्गत पूर्वी नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमधून प्रत्येकी ५० नागरिकांचे प्रतिनिधी मंडळ गुजरात येथे आमंत्रित करण्यात आले आहे.
यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील ५० नागरिकांचा समावेश असून, या प्रतिनिधी मंडळाच्या सहभागामुळे जिल्ह्याच्या नक्षलमुक्तीच्या प्रवासाला आणि शांतता, विकास व राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. अभय डोंगरे यांच्या समन्वयातून सदर प्रतिनिधी मंडळाच्या गुजरात दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.
प्रतिनिधी मंडळातील पहिल्या टप्प्यात दिनांक २७ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद भातनाते, नक्षल सेल, गोंदिया यांच्यासोबत ३ नागरिकांना एकता नगर, गुजरात येथे पाठविण्यात आले. या नागरिकांचा २ दिवसांचा गुजरात दर्शनाचा कार्यक्रम सुरू आहे.
त्यानंतर दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत हत्तीमारे आणि दीपक तरवडे यांच्या समवेत उर्वरित ४७ नागरिकांना गुजरात येथे रवाना करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया श्री. दिनेश शुक्ला यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रवासाला सुरुवात करण्यात आले. अशा प्रकारे गोंदिया जिल्ह्यातून एकूण ५० नागरिकांचे प्रतिनिधी मंडळ या ऐतिहासिक राष्ट्रीय एकता दिन सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
नक्षलमुक्त गोंदिया : संघर्षातून शांतता आणि विकासाकडे
एकेकाळी नक्षलवादाच्या प्रभावामुळे भीती, असुरक्षितता आणि विकासातील अडथळ्यांना सामोरे जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याने आज शांतता, सुरक्षितता आणि प्रगतीच्या दिशेने महत्त्वपूर्ण वाटचाल केली आहे. केंद्र शासन आणि महाराष्ट्र शासनाच्या नक्षलवाद निर्मूलनासाठीच्या सुरक्षा, विकास आणि पुनर्वसनविषयक सर्वसमावेशक उपाययोजनांमुळे जिल्ह्यात सकारात्मक परिवर्तन घडून आले आहे.
अतिदुर्गम आणि आदिवासीबहुल भागांमध्ये रस्ते, मोबाईल नेटवर्क, वीज, पाणी, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक तसेच इतर मूलभूत सुविधांचा विस्तार झाल्यामुळे नागरिकांचा शासनाशी संपर्क अधिक दृढ झाला आहे. विकासाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचू लागल्याने ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. या परिवर्तनामध्ये गोंदिया जिल्हा पोलीस दलातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘पोलीस दादालोरा खिडकी’ या अभिनव कम्युनिटी पोलिसिंग उपक्रमाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय योजना, रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी, कौशल्य विकास, आरोग्यविषयक सुविधा आणि इतर लोककल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
पोलीस दल आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे, युवकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि नक्षलवादाच्या प्रभावापासून समाजाला दूर ठेवणे या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे जिल्ह्यात शांतता व विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्र शासनाने ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवादाचे उच्चाटन करण्याचा संकल्प केला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधिकृत माहितीनुसार, ३१ मार्च २०२६ रोजी देशाला नक्षलमुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य झाल्याचे घोषित करण्यात आले. या राष्ट्रीय संकल्पसिद्धीच्या पार्श्वभूमीवर पूर्वी नक्षलप्रभावित असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांना राष्ट्रीय एकता दिन सोहळ्यासाठी विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करणे, हा शांतता, लोकसहभाग आणि विकासाच्या प्रवासाचा गौरव करणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.
सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील विविध संस्थाने एकत्र आणून अखंड भारताच्या निर्मितीत ऐतिहासिक योगदान दिले. त्यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना अभिवादन करताना गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे आयोजित राष्ट्रीय सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळणे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे.
एकेकाळी नक्षलवादाच्या सावटाखाली असलेल्या भागातील नागरिक आज देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणाऱ्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी जात आहेत, ही बदलत्या परिस्थितीची आणि लोकशाहीवरील दृढ विश्वासाची सकारात्मक साक्ष आहे. हा सहभाग केवळ गुजरात दौरा नसून शांतता, सुरक्षितता, विकास, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेप्रती असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे.
या ऐतिहासिक उपक्रमाबद्दल गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रतिनिधी मंडळ यांनी केंद्र शासन, महाराष्ट्र शासन तसेच संबंधित यंत्रणां आणि पोलिस दलाचे आभार व्यक्त केले आहे.

नक्षलमुक्त गोंदिया, सुरक्षित गोंदिया आणि विकसित गोंदिया या संकल्पनेला बळ देत जिल्ह्यात शांतता, विश्वास आणि विकासाची वाटचाल अधिक दृढ करण्यासाठी गोंदिया जिल्हा पोलीस दल कटिबद्ध आहे. : गोरख भामरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: नक्षलमुक्त गोंदिया जिल्ह्याचा राष्ट्रीय गौरव! ‘राष्ट्रीय एकता दिना’निमित्त गोंदियातील 50 नागरिकांचे प्रतिनिधी मंडळ एकता नगर, गुजरात येथे रवाना, ID: 31231

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर