गोंदिया, दि. 27 : कर्करोगासारख्या गंभीर आजाराचे वेळेत निदान झाल्यास त्यावर प्रभावी उपचार करणे शक्य होते. मात्र, ग्रामीण भागातील नागरिकांना तपासणीसाठी मोठ्या शहरांमध्ये जावे लागू नये, यासाठी आरोग्य सेवा थेट गावापर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. याच उद्देशाने राज्य शासनाने सुरू केलेला कॅन्सर निदान व उपचार व्हॅनचा उपक्रम महत्त्वपूर्ण असून, जिल्ह्यातील नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता या मोफत तपासणी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार विनोद अग्रवाल यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या कॅन्सर निदान व उपचार व्हॅनचे गोंदिया येथे आमदार विनोद अग्रवाल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. ही व्हॅन पुढील ४५ दिवस जिल्ह्यातील विविध ग्रामीण भाग आणि आरोग्य केंद्रांना भेट देऊन नागरिकांची प्राथमिक तपासणी, आरोग्यविषयक जनजागृती तसेच आवश्यक मार्गदर्शन करणार आहे.
तोंड, स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी
या व्हॅनच्या माध्यमातून प्रामुख्याने तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग या तीन प्रकारांची मोफत प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. आधुनिक उपकरणे आणि वैद्यकीय पथकाच्या साहाय्याने नागरिकांची तपासणी करण्यात येईल. तपासणीदरम्यान संशयित आढळणाऱ्या रुग्णांना पुढील तपासणी व उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाशी जोडण्यात येणार आहे.
कर्करोगाबाबत असलेली भीती, गैरसमज दूर करणे, आजाराची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि प्रतिबंधात्मक उपायांची माहिती देणे यासाठीही विशेष जनजागृती केली जाणार आहे. विशेषतः महिलांनी स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाच्या तपासणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
वेळेत निदान आणि उपचार महत्त्वाचे – जिल्हा शल्य चिकित्सक
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम पटले यांनी सांगितले की, कर्करोगाचे पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात निदान होणे उपचारांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या व्हॅनच्या माध्यमातून तज्ज्ञ वैद्यकीय पथक आणि आधुनिक तपासणी सुविधा थेट ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत. त्यामुळे आजाराचे वेळेत निदान होण्यास मदत होईल.
प्रत्येक तालुक्यात पोहोचणार व्हॅन – जिल्हा आरोग्य अधिकारी
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हार यांनी सांगितले की, पुढील ४५ दिवसांसाठी व्हॅनच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील आरोग्य केंद्रांपर्यंत ही व्हॅन पोहोचविण्यात येणार आहे. आशा सेविका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गावागावांत नागरिकांना याबाबत माहिती दिली जात आहे. नागरिकांनी विशेषतः महिलांनी या सुविधेचा लाभ घ्यावा.
जनजागृतीच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविणार – जिल्हा माहिती अधिकारी
जिल्हा माहिती अधिकारी अंजू कांबळे निमसरकर यांनी सांगितले की, आरोग्य विभागाचा हा उपक्रम जिल्ह्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रसारमाध्यमे आणि विविध जनजागृती माध्यमांच्या साहाय्याने व्हॅनच्या दौऱ्याची आणि तपासणी सुविधेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येईल.
यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तृप्ती कटरे, जिल्हा मौखिक आरोग्य अधिकारी डॉ. अनिल आटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी विजय आखाडे यांच्यासह के.टी.एस. जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कर्करोगाचे वेळीच निदान करून योग्य उपचार घेणे शक्य व्हावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे




