जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत प्रलंबित गुन्हे, तपास आणि अर्थसहाय्य प्रकरणांचा आढावा गोंदिया, दि. 27 : अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (ॲट्रॉसिटी) दाखल होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये पीडितांना वेळेत न्याय मिळण्यासाठी संबंधित विभागांनी अधिक संवेदनशीलतेने आणि परस्पर समन्वयाने काम करावे. तसेच प्रकरणांशी संबंधित आवश्यक कागदपत्रांची पूर्तता विलंब न करता वेळेत करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त किशोर भोयर, पोलीस विभागाचे योगीराज जाधव, जिल्हा माहिती अधिकारी अंजु कांबळे निमसरकर, जिल्हा शासकीय अभियोक्ता कार्यालयाचे प्रतिनिधी अंकुश काडुकर, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे सुधीर दसरिया तसेच नागरी हक्क संरक्षण पथक कार्यालयाचे गौरव गिरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पत्की म्हणाले, ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांचा तपास गुणवत्तापूर्ण व निष्पक्षपणे होणे आवश्यक आहे. गुन्हे दाखल झाल्यानंतर तपासाची प्रक्रिया गतीने पूर्ण करून पुढील कार्यवाही वेळेत करावी. केवळ गुन्ह्यांचा तपास पूर्ण करणे पुरेसे नसून, न्यायालयीन प्रक्रियेत दोषसिद्धीचे प्रमाण वाढविणेही महत्त्वाचे आहे. यासाठी तपासातील त्रुटी दूर करणे, आवश्यक पुरावे वेळेत संकलित करणे, साक्षीदारांशी संबंधित बाबींची दक्षता घेणे आणि न्यायालयीन प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. दोषसिद्धीमध्ये अडथळा ठरणाऱ्या बाबींचा सखोल आढावा घेऊन त्यावर संबंधित विभागांनी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत समितीचे सदस्य सचिव तथा समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी ऑक्टोबर 2026 अखेरपर्यंतच्या ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यांची माहिती सादर केली. यामध्ये पोलीस विभागाकडून प्राप्त गुन्हे, तपास सुरू असलेली प्रकरणे, तपास पूर्ण झालेल्या गुन्ह्यांची स्थिती, न्यायालयात प्रलंबित प्रकरणे तसेच पीडितांना अर्थसहाय्य देण्यासंदर्भातील प्रलंबित प्रकरणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
सन 2026-27 या आर्थिक वर्षात ऑक्टोबर 2026 अखेर जिल्ह्यात ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत एकूण 56 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये खुनाचे 2, बलात्काराचे 13, विनयभंगाचे 7, मारहाण व गंभीर दुखापतीचे 11, जातिवाचक शिवीगाळीचे 20 आणि इतर 3 गुन्ह्यांचा समावेश आहे. खुनाचा प्रयत्न आणि जाळपोळ यासंदर्भातील एकही गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही. दाखल गुन्ह्यांपैकी 36 गुन्हे अनुसूचित जातीशी, तर 20 गुन्हे अनुसूचित जमातीशी संबंधित आहेत. यापैकी 9 गुन्ह्यांचा पोलीस तपास सुरू असल्याची माहिती सहायक आयुक्त श्री. भोयर यांनी दिली.
ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल प्रकरणांमध्ये पीडितांना न्याय मिळवून देणे, त्यांना नियमानुसार अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे आणि न्यायालयीन प्रक्रियेत प्रभावी पाठपुरावा करणे यासाठी पोलीस विभाग, समाजकल्याण विभाग, अभियोक्ता कार्यालय तसेच संबंधित यंत्रणांनी नियमित समन्वय ठेवावा. प्रलंबित प्रकरणांचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यांचा निपटारा करण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी मंदार पत्की यांनी दिले.




