????खोदकामामुळे जुना मार्ग बंद, दोनदा भूमिपूजन पण कामाला सुरुवात नाही
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
सालेकसा तालुक्यातील भजेपार-बोदलबोडी दरम्यान वाघ नदीवर मोठे पुल मंजूर असून दोन वर्षापासून बांधकाम रखडलेले आहे. बांधकामासाठी खोदकाम करून खड्डे व ढिगारे अर्धवट ठेवल्याने जुना मार्ग देखील बंद झाला. परिणामी नागरीकांना १ किमी अंतरावर जाण्यासाठी १५ कीमी फेऱ्याने पायपीट करावी लागत असल्याने प्रचंड आक्रोश खदखदत आहे. अनेकदा निवेदने देऊन सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेत असल्याने त्याला झोपेतून जागवण्यासाठी 20 फेब्रुवारीला अर्ध जलसमाधी आंदोलन करण्यात येत आहे.
भजेपार येथील सरपंच तथा अखिल भारतीय सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष चंद्रकुमार बहेकार आणि बोदलबोडी येथील सरपंच देवेंद्र पटले यांनी या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना सलग 3 वेळा निवेदनातून गंभीर समस्येची जाणीव करून दिली. दरम्यान या विभागाने लवकरच काम सुरू होईल असे बोलत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. परंतु दिलेला शब्द विभागाने पाळला नाही. केवळ तारीख देऊन टाळाटाळ करण्याचे काम विभागाने केले आहे. अखेर कंटाळून नागरिकांनी आंदोलन करण्याची तयारी केली आहे. दरम्यान निवेदनाची प्रतीलिपी सालेकसाचे ठाणेदार, तहसीलदार तथा उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग सालेकसा यांना माहीतीस्तव व पुढील कार्य वाहिस्तव देण्यात आली आहे. सालेकसा आणि आमगाव तालुक्याला जोडणारा भजेपार – बोदलबोडी प्रजीमा-२४ हा महत्त्वाचा मार्ग असून शासन प्रशासनाच्या दिरंगाईमुळे मागील दोन वर्षापासून बंद पडून आहे. दरम्यान आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याने आतातरी शासन प्रशासनाचे डोळे उघडतील काय? याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.