गोंदिया जिल्हा होमिओपॅथीक
डॉक्टर संघटनेकडून राज्य शासनाचे अभिनंदन
साखरीटोला/सालेकसा -: (रमेश चुटे)
महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या नियमानुसार ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी’ (सीसीएमपी) हा सेतू अभ्यासक्रम पूर्ण करणारे होमिओपॅथी डॉक्टर नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नोंदणीस पात्र ठरतात. या नियमानुसार होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथीची औषधे विक्री करण्यास तसेच त्यांच्या चिठ्ठीवर रुग्णांना औषध विक्री करण्यास औषध विक्रेत्यांना महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने परवानगी दिली असल्याने गोंदिया जिल्हा होमिओपॅथीक डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डाँ. संजय रंगराव देशमुख यांनी राज्य शासनाचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद 1965 अंतर्गत नमूद अनुसूचीमध्ये ती व्यक्ती या कायद्यांतर्गत नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नोंदणी करण्यास पात्र ठरते. त्यामुळे सर्व औषध विक्रेते हे सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) पूर्ण करणाऱ्या होमिओपॅथी नोंदणीकृत डॉक्टर ॲलोपॅथी औषधांची विक्री करू शकतात. किरकोळ औषध विक्रेते होमियोपॅथी डॉक्टरांद्वारे देण्यात आलेल्या औषधांच्या चिठ्ठीद्वारे रुग्णांना औषध विक्री करू शकतात. मात्र ही औषध विक्री करताना औषध चिठ्ठीवर नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांचा नोंदणी क्रमांक व सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी (सीसीएमपी) प्रमाणपत्राचा क्रमांक नमूद करणे आवश्यक आहे. औषध चिठ्ठीवर या बाबी नमूद असल्याची खात्री करण्याची जबाबदारी औषध विक्रेत्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे राज्यामध्ये होमिओपॅथी डॉक्टर स्वत: रुग्णांना ॲलोपॅथी औषधांची चिट्ठी लिहू शकतात. राज्य शासनाने मान्यता दिलेला ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी’ (सीसीएमपी) उत्तीर्ण केला असल्यास संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांचा नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये समावेश करण्यात आले असून सदर वैद्यकीय व्यावसायिकाला आधुनिक चिकित्सा पद्धतीची औषधे वापरून वैद्यकीय व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली असल्याने गोंदिया जिल्हा होमिओपॅथीक डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डाँ. संजय देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शासनाचे अभिनंदन केले आहे.




