🔽प्रचारासाठी फक्त पाच दिवस मिळत असल्याने उमेदवारांचा लागणार कस,
साखरीटोला/सालेकसा (रमेश चुटे)
सालेकसा येथे नगरपंचायत निवडणुकीच्या पाश्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून उमेदवारीवरून भाजप, कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस (अजित पवार गट) राष्ट्रवादी कांग्रेस (शरद पवार गट) शिवसेना (शिंदे गट) शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मध्ये जोरदार रस्सीखेच सुरु असून बहुतांश इच्छुकांचा नगराध्यक्ष पदावर डोळा आहे. रुसव्या फुगव्यामुळे सर्वच प्रमुख पक्षाचे नेते हैराण असले तरी नगराध्यक्ष पदासाठी सर्वच पक्षांतून प्रतिष्ठित, नामांकित, शैक्षणिक व सामाजिक कार्यात अग्रगण्य लोकांचे नावे समोर येत आहेत. कांग्रेस कडून माजी मंत्रीभरतभाऊ बहेकार यांचे चिरंजीव कुंदन बहेकार, विजय सुदामभाऊ फुंडे, वरिष्ठ कार्यकर्ता लखनलाल अग्रवाल, भाजपकडून डाँ. राजेंद्र बडोले, उमेदलाल जैतवार, अमृतपालसिंग भाटिया, विक्की भाटिया, शाम येटरे, शिवसेना उद्धव गटातून सौ. वंदना पुरुषोत्तम क्षीरसागर, कुलतारसिंग भाटिया, राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गटातून ओबीसी आघाडीचे प्रमुख नेते मनोज डोये, शिवसेना शिंदे गटातुन मनीष असाटी, तर राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटातून ब्रजभूषण बैस ही सर्व नावे सर्वदूर परिचित असून हे उमेदवार समतुल्य बळ असल्याने एकूण 6 हजार 809 मतदार असलेल्या नगर पंचायत क्षेत्रात अखेर कोन बाजी मारणार याचे सहज आकलन करणे कठीण होणार आहे.
जाहीर कार्यक्रमानुसार, 10 नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. तर 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. अंतिम यादी 26 नोव्हेंबरला लागणार असून, चिन्हही त्याचदिवशी मिळणार आहे. त्यानंतर अधिकृत प्रचाराला सुरुवात होईल. त्यानुसार इच्छुकांना 26 ते 30 नोव्हेंबर असे पाच दिवस प्रचाराची धूम राहणार आहे. सदर नगरपंचायत कार्यक्षेत्र ना पूर्णपणे शहरी आहे आणि ना पूर्णपणे ग्रामीण. अशा या उपनगरीय भागाचा विस्तार दूरपर्यंत झाला असून
एकाहून अधिक गावांना एकत्र करून नगरपंचायत स्थापन करण्यात आले. अशा ठिकाणी मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवारांसाठी अवघड होणार असले तरी प्रचाराच्या पाच दिवसांत घरोघरी जाऊन मतांचा जोगवा मागण्याची संधी सर्वानाचं मिळणार आहे.





