आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर; शासकीय वस्तीगृहाची मागणी… गोंदिया जिल्ह्यातील आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी–विद्यार्थिनींनी आपल्या सुरक्षिततेसाठी आज प्रकल्प कार्यालय देवरी येथे जोरदार आंदोलन केलं. गोंदिया येथे सुरू असलेलं आदिवासी वस्तीगृह क्रमांक दोन हे अत्यंत धोकादायक ठिकाणी असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. गोंदिया शहरातील आदिवासी वस्तीगृह क्रमांक दोन हे डेंजर झोनमध्ये असून, त्या परिसरात नशा करणारे लोक मोठ्या प्रमाणात वावरतात. विशेषतः रात्रीच्या वेळी वस्तीगृहात ये–जा करताना विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. याशिवाय गोंदिया येथे शासकीय इमारत उपलब्ध नसल्यामुळे सध्या खासगी खोली भाड्याने घेऊन वस्तीगृह चालवलं जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, तात्काळ शासकीय इमारतीत वस्तीगृह सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या मागणीसाठी आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी प्रकल्प कार्यालय देवरी येथे एकत्र येत आंदोलन केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली…..“काही दिवसांच्या कालावधीत वस्तीगृह दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच कायमस्वरूपी शासकीय इमारतीसाठी आवश्यक जागेबाबत शासनाकडे पाठपुरावा केला जाईल.” नेहमी ही शासनाला याबाबत पाठपुरावे करण्यात येत आहे…प्रकल्प अधिकारी उमेश काशीद यांच्या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी तात्पुरते आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, दहा दिवसांच्या आत मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही विद्यार्थ्यांनी यावेळी दिला आहे. आता प्रशासन दिलेल्या आश्वासनांची कितपत पूर्तता करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…..




