🔽आमदार संजय पुराम यांची विधानसभेत मागणी
साखरीटोला/गोंदिया-:
महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय पुराम यांनी मतदारसंघातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सभागृहात ठामपणे मांडले. यामध्ये प्रामुख्याने ‘व्ही. जी. रामजी’ योजनेअंतर्गत धान रोवणी व धान कापणीची कामे समाविष्ट करण्याची त्यांनी केलेली मागणी विशेष चर्चेत राहिली आहे. शेतकऱ्यांच्या मजुरीचा आणि मजुरांच्या उपलब्धतेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार पुराम यांनी ही मागणी केली आहे. धान शेतीतील अत्यंत कष्टाची आणि खर्चाची मानली जाणारी रोवणी व कापणीची कामे जर सरकारी योजनेत समाविष्ट झाली, तर त्याचा थेट फायदा ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि कष्टकरी शेतकऱ्यांना होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
सभागृहात मांडलेले अन्य प्रमुख मुद्दे:
देवरी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायती सध्या सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येतात. भौगोलिक अंतर लक्षात घेता, या ग्रामपंचायती देवरी पोलीस ठाण्याला जोडण्यात याव्यात, सालेकसा तालुक्यातील कुवाढास मध्यम प्रकल्पासह इतर प्रस्तावित प्रकल्पांना तातडीने मंजुरी देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. तसेच देवरी तालुक्यातील गेडाम तलाव उपसा सिंचन योजनेला तात्काळ मंजुरी देण्याची आग्रही विनंती केले असून आमगाव/देवरी मतदारसंघातील अर्धवट राहिलेली विकासकामे मौजा हत्तीडोह, शिलापूर आणि वळेगाव येथील ब्रिज कम बंधारा व पुलांची बांधकामे त्वरित पूर्ण करण्याकडे शासनाचे लक्ष वेधले. मतदारसंघातील जवळपास १०,००० कुटुंबे रेशन धान्यापासून वंचित असून, रेशन कार्डाची मर्यादा वाढवून त्यांना लाभ मिळवून देण्याची मागणी त्यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे केली आहे. आमदार संजय पुराम यांनी अर्थसकल्पीय अधिवेशनात शेती, सिंचन आणि पायाभूत सुविधाच्या प्रश्नांवर भर देत सरकारकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.



