निवडणूक तयारीचा निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे यांनी घेतला आढावा
नागपूर, दि. ९ – नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक डॉ. हर्षदीप कांबळे यांनी दिले. निवडणूक तयारीचा त्यांनी आज आढावा घेतला.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीला विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, अपर आयुक्त राजेश खवले, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे आदी उपस्थित होते. तर नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
बैठकीत मतदान केंद्रांची व्यवस्था, मतदान साहित्याचे वितरण व संकलन, मतपेट्यांची उपलब्धता, मतदान कर्मचाऱ्यांचे नियोजन व प्रशिक्षण, वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था तसेच मतमोजणीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त भरारी पथके, व्हिडिओ सर्व्हेलन्स पथके, व्हिडिओ व्ह्यूइंग पथके आणि नियंत्रण कक्षांच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी याविषयीची माहिती दिली.
नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांत एकूण ४४५ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. त्यामध्ये नागपूर जिल्ह्यात २४६, वर्धा ४१, भंडारा ३५, गोंदिया ३९, चंद्रपूर ५८ आणि गडचिरोली जिल्ह्यात २६ मतदान केंद्रांचा समावेश आहे.
आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विभागात ८० भरारी पथके, ३४ व्हिडिओ सर्व्हेलन्स पथके, १४ व्हिडिओ व्ह्यूइंग पथके आणि सहा नियंत्रण कक्षांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान साहित्याची सुरक्षित हाताळणी, स्ट्राँग रूमची व्यवस्था आणि मतमोजणीसाठी आवश्यक पूर्वतयारी याबाबतही माहिती सादर करण्यात आली.
निवडणूक कार्यक्रमानुसार २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान होणार असून, २७ ऑक्टोबर रोजी मतमोजणी नियोजित आहे.



