नक्षलग्रस्त भागातील ५० नागरिक एकता नगर येथे विशेष अतिथी म्हणून सहभागी; शांतता, विकास आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश

गोंदिया, दि. ०१ : भारताचे लोहपुरुष आणि राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गुजरात राज्यातील एकता नगर, केवडिया येथे आज आयोजित भव्य राष्ट्रीय एकता दिन सोहळ्यात गोंदिया जिल्ह्यातील ५० नागरिक विशेष अतिथी म्हणून सहभागी होत आहेत. केंद्र शासनाच्या विशेष उपक्रमांतर्गत पूर्वी नक्षलग्रस्त असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांना या राष्ट्रीय सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले असून, त्यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील नागरिकांचा समावेश आहे.

देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व जपण्याचा संदेश देणाऱ्या या राष्ट्रीय सोहळ्यात गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना सहभागी होण्याची संधी मिळणे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. देशाच्या विविध भागांतील नागरिकांसोबत राष्ट्रीय एकात्मतेचा अनुभव घेण्याची तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याला अभिवादन करण्याची संधी या प्रतिनिधी मंडळाला मिळत आहे.

गोंदिया जिल्ह्याचा काही भाग पूर्वी नक्षलवादाच्या प्रभावाखाली होता. मात्र, शांतता प्रस्थापित करणे, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणे आणि विकासाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे या दिशेने जिल्ह्यात विविध प्रयत्न सुरू आहेत. पोलीस दल आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणे, युवकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे तसेच नक्षलवादाच्या प्रभावापासून समाजाला दूर ठेवणे यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांना या सहभागामुळे विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्ताने आयोजित या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या नागरिकांना देशाच्या एकात्मतेची आणि विविधतेतील एकतेची भावना अनुभवता येणार आहे. तसेच राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा, शांतता आणि विकास यांचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये देशाप्रती असलेली एकात्मतेची भावना अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

सरदार वल्लभभाई पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर देशातील विविध संस्थानांचे विलीनीकरण घडवून आणत अखंड भारताच्या निर्मितीत ऐतिहासिक योगदान दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि ठाम नेतृत्वामुळे देशाच्या एकात्मतेचा पाया अधिक मजबूत झाला. त्यांच्या या महान कार्याच्या स्मरणार्थ एकता नगर येथे उभारण्यात आलेल्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या परिसरात दरवर्षी राष्ट्रीय एकता दिनाचा भव्य सोहळा आयोजित केला जातो.

यंदाच्या सोहळ्यात गोंदिया जिल्ह्यातील नक्षलग्रस्त भागातील ५० नागरिकांचा सहभाग हा जिल्ह्याच्या शांतता, विकास आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या दिशेने सुरू असलेल्या वाटचालीचे प्रतीक ठरत आहे. नक्षलवादाच्या प्रभावातून बाहेर पडून विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याच्या प्रक्रियेला अशा उपक्रमांमुळे प्रोत्साहन मिळत असून, ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ या संकल्पनेला गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांच्या सहभागातून बळ मिळत आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: नक्षलग्रस्त भागातील ५० नागरिक एकता नगर येथे विशेष अतिथी म्हणून सहभागी; शांतता, विकास आणि राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश, ID: 31241

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर