सारस संवर्धनासाठी गोंदिया जिल्ह्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन; जिल्हास्तरीय समिती गठित

घाटटेमनी येथे राबविण्यात येणार पथदर्शी प्रकल्प; शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनासह प्रशिक्षण व प्रात्यक्षिकांचे आयोजन       

गोंदिया, दि. 6 : जिल्ह्यातील सारस पक्ष्यांच्या अधिवासाचे संरक्षण व संवर्धन करण्यासोबतच भातशेती परिसरातील जैवविविधतेचे जतन आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी नैसर्गिक शेतीचा प्रसार व प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी आमगाव तालुक्यातील घाटटेमनी येथे पथदर्शी नैसर्गिक शेती प्रकल्प राबविण्यात येत असून, या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय नैसर्गिक शेती समिती गठित करण्यात आली आहे. यासंदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

सारस पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणे, भातशेती परिसरातील जैवविविधतेचे संरक्षण करणे आणि रासायनिक निविष्ठांवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक शेती पद्धतींचा अवलंब वाढविणे हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीविषयक तांत्रिक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी हे समितीचे अध्यक्ष असून, मुख्यमंत्री कार्यालयाचे कृषी अर्थतज्ज्ञ तथा वरिष्ठ सल्लागार डॉ. परशराम पाटील यांच्यासह वन विभाग, कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र, गुजरात नैसर्गिक शेती विज्ञान विद्यापीठ, हलोल, BNHS, SEWA संस्था तसेच प्रगतिशील शेतकरी प्रतिनिधींचा समितीत समावेश करण्यात आला आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हे समितीचे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

समितीमार्फत सारस पक्षी संवर्धनाशी सुसंगत नैसर्गिक शेतीचा प्रसार करण्यासाठी जिल्हास्तरीय कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे. तसेच नैसर्गिक शेतीसाठी प्रात्यक्षिक क्षेत्रे, आदर्श गावे आणि लाभार्थी शेतकऱ्यांची निवड करण्यास मार्गदर्शन केले जाणार आहे. गुजरात नैसर्गिक शेती विज्ञान विद्यापीठातील शास्त्रज्ञांच्या सहकार्याने शेतकरी प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, क्षेत्रभेटी आणि अभ्यासदौऱ्यांचे आयोजन करण्यात येईल.

सारस पक्ष्यांच्या अधिवासाचे संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि नैसर्गिक शेतीचा विस्तार यासाठी कृषी विभाग, वन विभाग, आत्मा तसेच संबंधित संस्थांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारीही समिती पार पाडणार आहे. प्रकल्पातील प्रगतिशील शेतकऱ्यांचे अनुभव आणि यशोगाथांचा प्रसार करून इतर शेतकऱ्यांनाही नैसर्गिक शेतीकडे प्रोत्साहित केले जाणार आहे.

या पथदर्शी प्रकल्पाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यासाठी समितीची दरमहा बैठक आयोजित करण्यात येणार असून, बैठकीतील निर्णयांच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा केला जाणार आहे. सारस पक्ष्यांचे संवर्धन आणि शाश्वत शेती यांची सांगड घालणारा हा उपक्रम गोंदिया जिल्ह्यात पर्यावरणपूरक कृषी पद्धतींच्या विस्तारासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

Elgar Live News
Author: Elgar Live News

Leave a Comment

Ad debug output

The ad is displayed on the page

current post: सारस संवर्धनासाठी गोंदिया जिल्ह्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन; जिल्हास्तरीय समिती गठित, ID: 31310

Ad: MM LIGHTTING (2543)

Find solutions in the manual

आपले राशी भविष्य

नवराष्ट्र कौल

[democracy id="2"]

थेट क्रिकेट स्कोअर