पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये जमा; उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत देण्याची प्रक्रिया सुरू
गोंदिया, दि. ६ : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी अग्रीम मदतीचा लाभ गोंदिया जिल्ह्यातील ७४ हजार ९१० शेतकऱ्यांना मिळाला आहे. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण ३७ कोटी ४६ लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. पात्र उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे.
राज्यातील ३०४ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपये अग्रीम मदत देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यभरात मदत वितरणाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील ७४९१० शेतकऱ्यांचा समावेश आहे.
दि. ५ नोव्हेंबर २०२६ अखेर राज्यातील ८७ लाख ४५ हजार ६६९ शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये एकूण ४ हजार ३७२ कोटी ८३ लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील ७४ हजार ९१० शेतकऱ्यांचा समावेश असून, जिल्ह्यात आतापर्यंत ३७ कोटी ४६ लाख रुपयांचे वितरण झाले आहे.




