मुंबई : संपूर्ण देशात ईडीच्या सर्वाधिक धाडी महाराष्ट्रात पडत आहे. राज्य सरकारमधील १४ प्रमुख लोकांवर कारवाया केल्या जात आहेत. भाजपा नेत्यांवर धाडी पडत नाहीत. ते मुंबईच्या रस्त्यांवर भीक मागतायेत का? आयटी विभागाची भानामती कोण करतंय त्याचा मोठा खुलासा शिवसेना करेल. सुमीत नरवर दुध विकणारा व्यक्ती ४-५ वर्षात त्याची मालमत्ता ८ हजार कोटींवर गेली. मलबार हिल परिसरात त्याचं अलिशान घर आहे. ईडीने जो चष्मा लावला आहे त्यातून या लोकांकडे पाहावं. इतक्या कमी वर्षात एवढी संपत्ती कशी आली? असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
तसेच दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील कुठल्या भाजपा नेत्याची बेनामी संपत्ती त्याच्याकडे आहे. त्या नेत्याच नाव समोर आणणार आहे. पहिली ही नावं पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगणार मग पुढे माध्यमांसमोर आणणार आहे. ट्रायडेंट ग्रुपला कोणी काम दिली? आम्ही सर्व नावं उघड करणार त्यानंतर आमच्यावर जी चौकशी लावायची ती लावा, आम्हाला अटक होणार असेल तर खुशाल करा असा इशारा राऊतांनी दिला आहे.
संजय राऊत म्हणाले की, ईडीची वसुली सुरू आहे. सोमय्या ईडीचे वसुली एजेंट बनले आहेत. ईडी आणि ईडीचे अधिकारी भारतीय जनता पार्टीचे एटीएम मशीन बनले आहेत. मी त्यांच्या वसुलीचे सर्व पुरावे पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवले आहेत. २८ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलं आहे. स्वच्छ भारत अभियानात भ्रष्टाचाराचा कचराही साफ करायचा आहे. ईडीचे अधिकारी बिल्डर्स, कॉर्पोरेटर्सला धमकावतात. आमच्या घरात घुसला आता तुमच्या घरातही घुसण्याचा आम्हाला अधिकार आहे असं त्यांनी सांगितले.
जितेंद्र नवलानी कुणाचा माणूस?
जितेंद्र नवलानी यांच्या कंपन्यांमध्ये अनेक कंपन्यांनी पैसे ट्रान्सफर केले गेले. नवलानी हे ईडीचे अधिकारी आहेत. अविनाश भोसले यांच्या कंपन्यांकडून जितेंद्र नवलानी यांच्या कंपन्यांमध्ये १० कोटी रुपये दिले गेले. जितेंद्र नवलानी कुणाचा माणूस आहे? पैसे ट्रान्सफर का होतायेत? वेगवेगळ्या कंपन्या बँकांची कर्ज फेडू शकत नाहीत ते नवलानींच्या खात्यांवर पैसे जमा करतायेत. हा सगळा पैसा बाहेरच्या देशात बेनामी संपत्ती मिळवण्यासाठी केला जात आहे. या रॅकेटमध्ये महाराष्ट्रातील प्रमुख भाजपा नेत्यांचाही सहभाग आहे. देशातील सर्वात मोठं भ्रष्टाचाराचं रॅकेट मुंबईत बसून सुरू आहे. या खंडणीची चौकशी मुंबई पोलीस करतील असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.
..तोवर शिवसेना शाखेतही धाडी पडतील
आमच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या घरावर आयटी धाड टाकली जात आहे. मुंबईत निवडणुका होत नाही तोवर प्रत्येक शाखेत धाड टाकली जाईल. ईडी, आयटी या तपास यंत्रणांना हेच काम आहे. शिवसेना कार्यकर्ता, शिवसेना शाखेवर धाडी टाकली जाणार आहे. केवळ महाराष्ट्र, बंगालसारख्या राज्यात निवडक लोकांना केंद्रीय तपास यंत्रणा टार्गेट का करतेय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. देशात इतर राज्यात कुठेही केंद्रीय तपास यंत्रणा धाडी अथवा प्रश्न विचारत नाही. सरकार पाडण्याचं हे षडयंत्र आहे. शिवसेनेच्या नेतृत्वात असलेल्या महाविकास आघाडी सरकारला पाडण्यासाठी दबावतंत्राचा वापर केला जात आहे. ईडी, सीबीआयला आतापर्यंत आम्ही ५० नावं पाठवली. तरीही ईडी, आयटीनं कुठलंही कारवाई केली नाही. राज्यसभा खासदार जर एखाद्या गोष्टीवर आरोप करतोय. पुरावे देतोय तरी त्यावर विश्वास ठेवला जात नाही. भाजपाचे नागपूरमधील निकटवर्तीय ७५ कंपन्या बोगस आहेत. त्याची यादी मी दिली. त्यावर काय झाले? असा हल्लाबोल संजय राऊतांनी भाजपावर केला आहे.