सिंधुदुर्ग : नवी दिल्ली येथील डॉ. विशाखा साेशल वेल्फेअर फांऊडेशनतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय सर्वोत्कृष्ट महिला २०२२ चा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षा संजना संदेश सावंत यांना जाहीर झाला आहे.
जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून ९ मार्च रोजी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनमध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
मिझोरामचे माजी राज्यपाल अमोलक रत्तन कोहली यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, केंद्रीय मंत्री प्रतिमा भौमिक, केंद्रीय मंत्री भारती पवार, केंद्रीय बाल कल्याण विभागाचे चेअरमन प्रियांक कानूगो तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर अध्यक्षपदाच्या कार्यकाळात संजना सावंत यांनी समाजात केलेले काम, कोरोना काळात केलेले काम या सर्व गोष्टींचा विचार करून हा पुरस्कार देण्यात आला आहे.