देवरीः- तांदूळ नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील सात राईस मिलर्सला तीन वर्षाकरिता काळ्या यादीत टाकण्यात आले.पुढचे तीन वर्ष या सातही राईस मिलर्सला शासकीय धान्याची भरडाई करता येणार नाही. त्यामुळे राईस मिल मालकांमध्ये खळबळ उडाली आहे.गोंदिया जिल्हा मार्केटींग फेडरेशन तसेच आदिवासी विकास महामंळाने गोंदिया जिल्ह्यात खरेदी केलेल्या शासकीय धान्याची भरडाई करते. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील इतर राईस मिलर्ससह देवरी तालुक्यातील वसंत राईस मिल डोगरगाव, तिरुपती राईस मिल देवरी, महाराष्ट्र एग्रो इंडस्ट्री चिचगड, मा भगवती राईस इंडस्ट्री देवरी, इंडियन फूड प्रॉडक्ट चिचगड, बालाजी राईस मिल बोरगाव बाजार तसेच माँ शक्ती राईस इंडस्ट्री देवरी यांच्याशी धान्य भरडाईचा करार केला होता. भरडाई केलेला तांदूळ देवरी तालुक्यात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यलयाने भाड्याने घेतलेल्या आशु गोदामात एप्रिल २०२२ मध्ये जमा करण्यात आला होता. त्यावेळी तांदूळ गुणवत्ता अधिकारी म्हणून कार्यरत असलेले सतीश अगडे यांनी या सातही राईस मिलर्सने जमा केलेला २७ लॉट तांदळाची गुणवत्ता तपासून तांदूळ जमा केला होता.मात्र ७ मे रोजी आशु गोदामात तांदूळ तपासणीकरिता आलेल्या केंद्रीय पथकाने हा तांदूळ मानवी खाण्यास योग्य नसल्याचे सांगत या तांदळाचे लाॅॅट रद्द करीत सातही राईस मिलर्सला तीन वर्षाकरिता शासकीय धान्याची भरडाई करता धान्य देऊ नये असे निर्देश दिले.म्हणून या राईस मिलला काळ्या यादीत टाकण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकरी चिन्मय गोतमारे यांनी दिली आहे. दुसरीकडे जिल्हा पुरवठा कार्यालयाने देवरी तालुक्यात एप्रिल २०२२ ला नियुक्त केलेले तांदूळ गुणवत्ता अधिकारी सतीश अगडे यांनी तांदळाची गुणवत्ता तपासून सातही राईस मिलर्सचा तांदूळ गोदामात जमा करून घेतला होता. दुसरीकडे याच तांदळाला केंद्रीय पथकाने मानवी खाण्यास हा तांदूळ योग्य नसल्याचे सांगत कोट्यवधी रुपयांचा २७ लॉट तांदूळ रद्द केला.आणि या सातही राईस मिलर्सकडून नवीन तांदूळ जमा करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकर्यांना दिल्या आहेत. त्यामुळे तत्कालीन तांदूळ गुणवत्ता अधिकारी सतीश अगडे यांनी तांदूळ जमा करताना खरंच हा तांदूळ कुठल्या पद्धतीने तपासून घेतला होता. जो आज रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे यांच्या कार्यप्रणालीवर राईस मिलर्सने प्रश्न चिन्ह निर्माण करीत न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तांदूळ नगरी म्हणून नाव लौकिक आलेल्या गोंदिया जिल्ह्यात अधिकऱ्यांच्या संगनमताने राईस मिलर्स मानवी खाण्यास योग्य नसलेला तांदूळ शासकीय तांदूळ गोदामात जमा करीत असल्याचा केंद्रीय पथकाच्या तपासात उघड आले आहे
