डवकी ते फुक्कीमेटा मार्गावरील घटना
देवरीः- दि. ३०- तालुक्यातील बोरगाव (डवकी) येथून रोवणीच्या कामासाठी फुक्कीमेटा येथे सुमारे ३१ महिला मजूरांना वाहून नेणाऱ्या पिकअप वाहनाला अपघात झाल्याने महिला मजूर जखमी झाल्याची घटना काल सकाळी दहा वाजेच्या सुमारास डवकी गावाजवळ घडली. या गुन्ह्याची नोंद देवरी पोलिसांत करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. सविस्तर असे की, तालुक्यामध्ये रोवणीच्या कामाला सुरवात झाल्याने अनेेक शेतकरी बाहेर गावावरून मजूरांची ने-आण करतात. अशाच प्रकारे तालुक्यातील बोरगाव येथून सुमारे ३१ महिला मजूर रोवणी कामासाठी फुक्कीमेटा येथे सकाळी १० च्या सुमारास पिकअप वाहन क्र.एमएच ३३ जे ०५१ ने जात असताना वाहन चालक प्रवीण विनायक राऊत याचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात हे वाहन उलटले. यामुळे वाहनात असलेल्या सर्व मजूरांना मार लागल्याने जखमी झाले. तात्काळ सर्व गंभीर महीलांना सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.व उपचार करण्यात आले.काही महीलांना गोंदिया येथे रेफेर करण्यात आले.