भजेपार ग्राम पंचायतीची मागणी सालेकसा: (बाजीराव तरोणे) भजेपार येथून जाणाऱ्या तथा सालेकसा आणि आमगाव तालुक्याला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मागील दोन ते तीन वर्षापासून या रस्त्यांचे
डांबरीकरण पूर्णतः उखडले असून जीवघेणे खड्डे पडले आहेत. शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून तातडीने बांधकाम मंजूर न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
ग्राम पंचायत भजेपारच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि लोकप्रतिनिधींना रस्त्यांचे बांधकाम तत्काळ मंजूर करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे . यात प्रामुख्याने भजेपार – अंजोरा, भजेपार – गांधीटोला, भजेपार – कन्हारटोला – रामपूर आणि भजेपार – बोदलबोडी या चारही मुख्य मार्गांच्या दुरवस्थेची जाणीव करून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भजेपार हे गाव पूरग्रस्त असून चारही बाजूंनी नदी नाल्यानी वेढलेले आहे. रस्त्यांबरोबर या मुख्य मार्गावरील पुल देखील जीर्ण झाले असून नव्याने अधिक लांबी आणि उंचीचे पुल बांधकाम करण्याची मागणी केली आहे. अनेक वेळा निवेदने देऊन देखील याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असून यापुढे निवेदनातून नव्हे तर आंदोलनातून शासनाचे ध्यानाकर्षण करू असा इशारा ग्राम पंचायत भजेपारचे सरपंच चंद्रकुमार बहेकार, उपसरपंच कुंदा ब्राह्मणकर, ग्राम पंचायत सदस्य रवीशंकर बहेकार, रेवतचंद बहेकार, राजेश बहेकार, मनीषा चुटे, सरस्वता भलावी, आशा शेंडे, आत्माराम मेंढे, ममता शिवणकर सहित गावकऱ्यांनी दिला आहे. बॉक्स…. पुलावरील कठडे गायब, अपघातास आमंत्रणपुलावरून अवागमन करताना अपघात होऊ नये म्हणून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुलाच्या दोन्ही बाजूस कठडे बसवले जातात. मात्र परिसरातील अनेक पुलावरील कठडे गायब असल्याने अपघातास आमंत्रण मिळत आहे. कठडे बसविण्याची मागणी ग्राम पंचायतीने केली मात्र आज पावेतो बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. शासन प्रशासनाने नागरिकांचा अंत पाहू नये मागील दोन ते तीन वर्षांपासून या प्रमुख रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून मोठमोठे जीवघेणे खड्डे पडले आहेत. रस्त्यांची डागडुजी व दुरुस्ती करणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाने दुरुस्तीच्या मागे न लागता नव्याने डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण मंजूर करावे. नागरिकांचा अधिक अंत घेऊ नये अन्यथा संयमाचा बांध फुटला तर तीव्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल.
चंद्रकुमार बहेकार, (सरपंच) ग्राम पंचायत भजेपार.
