साखरीटोला-: (रमेश चुटे) आमगाव पंचायत समिती अंतर्गत ग्रामपंचायत पानगाव येथील कन्हारटोला गावात जल जीवन मिशन अंतर्गत गोंदिया येथील एका कंत्राटदाराने पाणीपुरवठा योजनेच्या नवीन पाइपलाइन टाकण्याच्या कामाला सुरुवात केले आहे. मात्र पाइपलाइन खोदकामामुळे अंतर्गत रस्त्याची वाट लागली असल्यामुळे वाहन तर सोडा पायी चालने सुद्धा मुश्किल झाले आहे. सदर रस्त्याची दुरावस्था पाहून पानगाव ग्रामपंचायतच्या सरपंचाने संबंधित कंत्राटदार व फोन व्दारे सूचना दिली मात्र ठेकेदार व कनिष्ठ अभियंत्याने प्रतिसाद दिले नाही. गावातील अंतर्गत रस्त्याचे कडेला खोदकाम करून, खोदलेली माती रस्त्यावर टाकली जात आहे. सध्या पावसाचे दिवस सुरू असल्याने, खोदलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावर पावसाचे पाणी पडत असून, रस्ता चिखलमय झाला आहे. त्यामुळे नागरिकांचे या रस्त्यावरून आवागमन करणे कठीण झाले आहे. खोदकाम झाल्याबरोबर पाइप टाकून नाली बुजवत नाही. नाली बुजविली, तरी अर्धी माती रस्त्यावरच पडून राहते. मातीमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सध्या हा रस्ता चिखलमय झाला आहे. तरी जिल्हा परिषद गोंदिया प्रशासनाने विशेष लक्ष घालून त्वरित रस्त्यावरील माती हटवावे अशी मागणी गावकऱ्यानी केले आहे.
