साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
संत शिरोमणी १०८ आचार्य विद्यासागर महाराज यांचे डोंगरगढ़ (छत्तीसगड) येथील प्रज्ञागिरी तीर्थस्थळ येथे देहांत झाले. अनंतात विलीन झालेल्या आचार्य विद्यासागर यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी मध्यप्रदेश राज्यातील रीवा/सतना येथील सहा भाविकांच्या वाहनाला अपघात होवून तिघांचा मृत्यू झाला. तर तिघे जण थोडक्यात बचावले. ही घटना सालेकसा तालुक्यातील आमगाव-सालेकसा मार्गांवरील पानगाव येथे आज, सकाळी १२ वाजताचें सुमारास घडली. जितेंद्र विमललाल जैन (५२), प्रशांत नरेंद्र जैन (४४), आशिष अशोक जैन (४३) तिन्ही रा.सतना (मध्यप्रदेश) असे मृतकांची नावे आहेत. संत शिरोमणी १०८ आचार्य विद्यासागर महाराज यांचे आज (ता.१८) छत्तीसगढ राज्यातील डोंगरगढ प्रज्ञागिरी तीर्थस्थळ येथे देहांत झाले. आचार्य विद्यासागर अनंतात विलीन झाल्याची वृत्त पसरताच भाविकांमध्ये शोक व्याप्त झाला. दरम्यान अंतिम दर्शन घेण्यासाठी भाविक डोंगरगढच्या दिशेने रवाना होऊ लागले. त्यातच मध्यप्रदेश राज्यातील रिवा/सतना येथील जितेंद्र विमललाल जैन, प्रशांत नरेंद्र जैन, आशिष अशोक जैन, वर्धमान सिद्धार्थ जैन, अंशुल संतोष कुमार जैन व प्रशांत प्रसन्न जैन सहा जण कार क्र.एमपी-१९/सीबी-६५३२ ने डोंगरगढच्या दिशेने निघाले.सकाळी ११ वाजता सुमारास गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथील पानगाव शिवारातून प्रवास करीत असताना कालव्याजवळ कार अनियंत्रित होवून कालव्यात कोसळली. या घटनेत जितेंद्र विमललाल जैन, प्रशांत नरेंद्र जैन, आशिष अशोक जैन या तिघांचा पाण्यात बुडून घटनास्थळीच मृत्यू झाला. तर वर्धमान सिद्धार्थ जैन, अंशुल संतोष कुमार जैन व प्रशांत प्रसन्न जैन हे तिघे जण थोडक्यात बचावले. या घटनेने भाविकांवर काळाने झेप घेतल्याची चर्चा होती. अपघाताची माहिती मिळताच सालेकसा पोलिस प्रशासनाने नागरिकांच्या मदतीने बचाव कार्याला सुरूवात केली होती.