वर्षभरात भजेपार गावाला 53 लाखाचे पुरस्कार!
साखरीटोला/सालेकसा:- (रमेश चुटे)
सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्रामपंचायतीने लोकसहभाग, श्रमदान, एकता, शासकीय योजना, आणि सु-नियोजनाच्या बळावर वर्ष 2022-23 मध्ये स्मार्ट व्हीलेज जिल्हा स्तर 40 लाख, तालुका स्तर 10 लाख, आणि स्वच्छता अभियानात जिल्हास्तरीय तिसरे 3 लाख असे एकंदरीत 53 लाखाचे बक्षीस वर्ष भरात पटकावले आहेत. 1 मार्च 2024 रोजी गोंदिया येथील ग्रीनलँड लॉन मध्ये आयोजीत कार्यक्रमात भव्य सत्कार समारोह पार पडणार आहे. दिनांक 20 फेब्रुवारी 2024 रोजी स्मार्ट व्हिलेज जिल्हा स्तरीय तपासणी टीमने भजेपार गावात येऊन विविध उपक्रमाची पाहणी करून तपासणी केले होते. टीम मधे जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) श्री खामकर, त्यांची संपूर्ण टीमने ग्राम पंचायत भजेपार येथे भेट देऊन स्मार्ट व्हिलेज जिल्हा स्तरीय तपासणी केले. यात प्रामुख्याने गावातील शाळा, वाचनालय, उद्यान, आरोग्य उपकेंद्र, ध्यान मंदीर, अंगणवाडी, ग्रीन जिम, सहित विविध ठिकाणांची व व्यवस्थापनाची प्रत्यक्ष पाहणी केली. गावातील विकास कामे आणि उपक्रमावर सविस्तर चर्चा करत काही सूचना केल्या. सोबतच सुरू असलेल्या अनेक उपक्रमाचे आणि लोकसहभागाचे कौतुकही केले. यावेळी सालेकसा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी खोटेले, विस्तार अधिकारी पराते, सरपंच चंद्रकुमार बहेकार, ग्रामसेवक रितेश शहारे, ग्रामपंचायतचें पदाधिकारी, महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे पदाधिकारी, बचत गट समूहातील महिला, आरोग्य उपकेंद्राचें कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.
Author: Elgar Live News
Post Views: 272