भाजप 31, शिवसेना 13 आणि राष्ट्रवादी 4 जागांवर निवडणूक लढवणार?
मुंबई-: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील सत्ताधारी महायुतीत जागावाटपाचा तिढा सुटल्याची माहिती समोर आली आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात जागावाटप मंजूर झाल्याच्या बातम्या सध्या समोर येत आहे. मात्र सध्या याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील सूत्रांच्या हवाल्याने भाजप 31, शिवसेना 13 आणि राष्ट्रवादी 4 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सूत्रांनी सांगितले की, ‘महायुतीत डील झाली असून त्यात भाजप 31, शिवसेना 13 आणि अजित पवारांची राष्ट्रवादी 4 जागांवर निवडणूक लढवणार आहे. पवार यांना बारामती, शिरूर आणि रायगड तसेच परभणी ही जागा मिळणार आहे. वृत्तानुसार, शिवसेना 13 जागांवर निवडणूक लढवणार असून, त्या बदल्यात भाजपला मुंबईतील 5 जागांवर उमेदवार उभे करण्याची संधी मिळणार आहे. शिंदे सेनेने उत्तर-पश्चिम मुंबईच्या जागेऐवजी ठाण्याची जागा निवडल्याचे वृत्त आहे. तो मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या डीलनुसार शिंदे सेना दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. सध्या येथून राहुल शेवाळे खासदार आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अनिल देसाई यांना उमेदवारी देण्याची तयारी केल्याचे वृत्त आहे. त्यांनी अद्याप अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. वृत्तातील सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले जात आहे की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे चर्चेदरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांची मनधरणी करण्यात यशस्वी ठरले. सूत्रांनी सांगितले की, ‘शहांसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत शिंदे यांनी सुरुवातीला 18 जागांची मागणी केली होती, ज्या 2019 मध्ये सेनेने जिंकल्या होत्या. यानंतर ते 15 वर आले. अखेर दिल्लीत झालेल्या बैठकीत शहा यांनी 13 जागांवर सहमती दर्शवली.