वातावरण बदलले की वीज पुरवठा होते खंडित
साखरीटोला-/सालेकसा (रमेश चुटे)
वातावरणात किंचित सुद्धा बदल होताच सालेकसा तालुक्यातील साखरीटोला येथील वीज पुरवठा खंडित होणे सामान्य बाब झाली आहे. वीज वितरण व्यवस्था एवढी कमकुवत झाली आहे कि थोडी फार हवा, किंवा हलक्याफुलक्या पावसालाही सहन करू शकत नसल्याचे दिसते आहे. विशेष म्हणजे विज वितरण कंपनी दर आठवड्याला मेंटेनन्सच्या नावावर तासन्तास वीज पुरवठा खंडित ठेवते. वीज पुरवठा अचानक खंडित होत असल्याने विजेवर चालणारे उपकरण पंखे, कुलर, फ्रिज, एलईडी, कॅम्पुटर इत्यादी उपकरण खराब होऊ लागले आहेत. यामुळे महावितरणच्या व्यवस्थापण कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ग्राहक नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे. साखरीटोला येथे 33 केव्हीचे पावर हाऊस आहे. मात्र ग्रामीण भागात विज व्यवस्थापणाकडे विज वितरण कंपनीचे लक्ष नाही. सर्व कारभार रामभरोसे सुरू आहे. यासंदर्भात विचारले तर कंपनी वातावरणातील बदलाचे कारण सांगून आपले हात वर करीत असते. जर भर उन्हाळ्यात वातावरणात बदल होऊन थोडी फार हवा, किंवा हलक्याफुलक्या पावसालाही विज वितरण कंपनी सहन करु शकत नसेल, तर पावसाळ्यात काय अवस्था होणार. याकडे सालेकसा व साखरीटोला येथील विज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे असी विज ग्राहकांची मागणी आहे.
