👉 मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
👉सकाळी 8 वाजेपासून मतमोजणी सुरू
देवरी/साखरीटोला-: (रमेश चुटे)
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाची प्रतीक्षा संपली असून 23 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आमगाव विधानसभा मतदारसंघासाठी देवरी येथील (ITI) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणी सुरळीत पार पाडण्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून 14 टेबलांवर 23 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. यात 22 फेऱ्या 14 टेबलांवर, शेवटची फेरी 3 टेबलांवर होणार आहे. मतमोजणीसाठी एकूण 14 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या 22 फेऱ्यांमध्ये प्रत्येक फेरीत 14 टेबलांवर मतमोजणी होईल, तर 23 व्या फेरीत केवळ तीन टेबलांवर उरलेल्या तीन मतदान केंद्रांची मतमोजणी पूर्ण केली जाणार आहे.
मतदान आणि उमेदवारांची माहिती
20 नोव्हेंबरला झालेल्या मतदानात आमगाव, देवरी, आणि सालेकसा या तीन तालुक्यांतील ३११ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडले. यामध्ये आमगाव तालुक्यात १२१, देवरीत १०८, आणि सालेकसात ८२ मतदान केंद्रांचा समावेश होता. निवडणुकीत एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते, तसेच दहाव्या क्रमांकावर ‘नोटा’ पर्याय होता.
मतमोजणीची प्रक्रिया
टपाली मतांची मतमोजणी: सकाळी 8.00 वाजता सर्वप्रथम टपाली मतांची मोजणी चार टेबलांवर तीन फेऱ्यांत पूर्ण केली जाईल.
कर्मचारी मतदान:
निवडणूक प्रक्रियेत सहभागी कर्मचाऱ्यांचे मतदान एका टेबलावर एकाच फेरीत पूर्ण होईल.
ईव्हीएम मतमोजणी
सकाळी 9.00 वाजल्यापासून ईव्हीएमवरील मतमोजणी सुरू होईल.
मतमोजणीसाठी कर्मचाऱ्यांची तैनाती
ईव्हीएम मतमोजणीसाठी 56 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत, ज्यामध्ये 14 सुपरवायझर, 14 सहाय्यक, 14 निरीक्षक, आणि 14 चपराशांचा समावेश आहे.
टपाली मतदानासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त
टपाली मतदानासाठी वेगळे कर्मचारी नियुक्त असून एकूण 76 कर्मचारी मतमोजणी प्रक्रियेसाठी तैनात आहेत.
निकालाचा अंदाज आणि वेळ
एकदंरीत 28 फेऱ्यांत मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होईल. दुपारी निवडणुकीच्या निकालाकलाबाबतची माहिती मिळण्याची अपेक्षा असून अंतिम निकाल सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत जाहीर होईल.
आमगाव मतदारसंघाच्या मतमोजणीवर विशेष लक्ष :
मतमोजणीचा कार्यक्रम सुसूत्रतेने पार पाडण्यासाठी उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. निकालासोबतच मतदारसंघात उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.