महायुती सरकारनी मंत्रिमंडळात गोंदिया जिल्ह्याला प्राधान्य द्यावे
साखरीटोला/सालेकसा-: (रमेश चुटे)
भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. गोंदिया जिल्हा निर्मितीला आज 25 वर्ष लोटली, मात्र या 25 वर्षात 2014 मध्ये पहिल्यांदा स्थानिक पालकमंत्री म्हणून इंजि.राजकुमार बडोले यांना जवाबदारी मिळाली होती. हा काळ सोडला तर गोंदिया जिल्ह्याला अधिकत्तर पार्सल पालकमंत्री मिळाले ते सुध्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातूनच मिळाले हे उल्लेखनीय आहे.
गोंदिया जिल्ह्यात महायुतीला मिळाले भरघोष यश
या विधानसभा निवडणुकीत महायुतीला गोंदिया जिल्ह्यात भरघोष यश मिळाल्याने राज्य मंत्रिमंडळात जिल्ह्यातीलच आमदाराला स्थान मिळेल अशी अपेक्षा जनतेलाच नव्हे तर महायुतीचे नेते व कार्यकर्त्यांना सुध्दा होती. पण पुन्हा एकदा गोंदिया जिल्ह्याची उपेक्षा झाली आहे. भरगच्च यश मिळून सुद्धा मंत्रिमंडळात गोंदिया जिल्ह्यातील आमदाराला स्थान मिळाले नाही ही जिल्हावासियांसाठी शोकांतिका आहे. गेल्या पाच वर्षापूर्वी महाविकास आघाडीच्या कालखंडात सुद्धा गोंदिया जिल्ह्याला पार्सल पालकमंत्रीच लाभले. आता महायुतीच्या फडणवीस सरकारमध्ये देखील पुन्हा जिल्ह्याच्या नशिबी पार्सल पालकमंत्रीच येणार आहे.
पटेलांना गोंदिया जिल्ह्यातील पालक मंत्री मान्य नाही का?
गोंदिया जिल्ह्याच्या राजकीय विचार केल्यास या जिल्ह्याचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे (अप) कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांचाच वरचष्मा आहे. दिल्ली मुंबईतील नेत्यांना या जिल्ह्यातील काही निर्णय घेतांना यांचे विचार लक्षात घ्यावे लागते. आत्ता तर खा.पटेल हे महायुतीच्या घटक पक्षाचे मोठे नेते आहेत. गोंदिया जिल्ह्यात त्यांच्या पक्षाचे आमदार पण आहेत तरी पहिल्या टप्यात मंत्रिमंडळात स्थान न मिळणे ही बाब शंकास्पद आहे. असे तर नाही की गोंदिया जिल्ह्याचा पालकमंत्री हा जिल्ह्यातील नसावा यासाठी स्वतः प्रफुल्लभाई पटेलच आडकाठी निर्माण करतात असा सूर जनतेतूनच नव्हे तर महायुतीच्या घटक पक्षातील नेतेही दबक्या आवाजात बोलू लागले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये शेजारच्या नागपूर जिल्ह्यातील तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख, नंतर प्राजक्त तनपुरे, नवाब मलिक हे तर महायुतीचे सरकार येताच भाजपचे सुधीर मुनगंंटीवार व त्यानंतर गडचिरोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मरावबाबा आत्राम यांना जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले. महायुती सरकारमध्ये जिल्ह्याला मंत्रिपद मिळण्याची मोठी आशा होती पण ती आता फोल ठरली. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत गोंदिया जिल्ह्यातून भाजपचे विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, संजय पुराम असे 3 आमदार मोठया मताधिक्याने निवडून आले आहेत. विजय रहांगडाले यांनी विजयाची हेट्रिक मारली, तर विशेष म्हणजे गोंदिया मतदारसंंघात तर विनोद अग्रवाल यांनी पहिल्यांदाच कमल फुलवले राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली जागा कायम ठेवली. त्यामुळे मंत्रिपदासाठी प्रत्येकाच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. विनोद अग्रवालांनी विजयाचा इतिहास करण्यासोबतच 60 हजार मताधिक्यासह काँग्रेसला पटकणी दिली आहे. तरी जिल्ह्यात जिल्हाचा पालकमंत्री नसून जिल्ह्याचे कारभार व विकास पार्सल पालकमंत्री साहेबांवर निर्भर राहणार आहे.