🔷सालेकसाचे तहसीलदारामार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांना सामाजिक कार्यकर्ते ब्रजभूषण बैस, व बाजीराव तरोने यांचे निवेदन
साखरीटोला/सालेकसा-: आदिवासी बहुल, जंगलव्याप्त, नक्षल प्रभावित सालेकसा नगरपंचायत क्षेत्रात अधिकत्तर आदिवासी गावांचा समावेश आहे. येथे शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. येथे मोठे कलकारखाने व उद्योग धंदे नसल्याने येथील शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना रोजगाराच्या शोधात भटकंती करावी लागत असते. दरम्यान महाराष्ट्र राज्य शासनाने सालेकसा नगरपंचायत क्षेत्रात तात्काळ रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावे अशी मागणी सालेकसा येथील सामाजिक कार्यकर्ते ब्रजभूषण बैस व बाजीराव तरोने यांनी केले असून, दिनांक 6 जानेवारी रोजी या संदर्भातील निवेदन सालेकसाचे तहसीलदार नरसय्या कोंडागुर्ले यांचे मार्फत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे साहेबांना प्रेषित करण्यात आले आहे. सालेकसा नगर पंचायत क्षेत्रात मागील 10 वर्षा पासून रोजगार हमी योजनेचे कामे बंद असल्यामुळे नगरपंचायत क्षेत्रातील सुमारे 1700 जॉब कार्ड धारक मजूर कामापासून वंचित झाले आहेत. मजुरांच्या हाताला काम नसल्याने इतर शहरात जाऊन भटकंती करावी लागत आहे. सालेकसा नगर पंचायत क्षेत्रात रोजगार हमी योजनेचे कामे तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी मजुराच्या वतीने निवेदनात नमूद केले आहे. सालेकसा नगरपंचायत क्षेत्रात बाखलसर्रा, जांभळी, हलबीटोला, मुरूमटोला, कुवाचीटोला आमगाव खुर्द, सालेकसा आदी गावांचा समावेश आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती व शेतमजुरी आहे. येथे रोजगाराच्या इतर कोणत्याही संधी नाहीत. परिणामी येथील नागरिकांना जिल्ह्याबाहेर व इतर प्रांतात रोजगारासाठी धाव घ्यावी लागते. येथे खरीप हंगामात फक्त धान पीक घेतले जाते. नगरपंचायत झाल्यानंतर शंभर दिवस रोजगाराची हमी असलेली योजना बंद झाली असल्यामुळे येथील ग्रामीणांचा रोजगार हिरावला आहे. करिता नागरिकांना रोजगार हमी योजनेअंतर्गत कामे देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ब्रजभूषण बैस, व बाजीराव तरोने यांनी केले आहे.
